World Cup 2023 IND vs ENG Match Live Score :- आज, एकदिवसीय विश्वचषक 2023च्या 29व्या सामन्यात भारताचा सामना गतविजेत्या इंग्लंडशी होत आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. या विश्वचषकात इंग्लंडने आतापर्यंत काही विशेष कामगिरी केली नसली तरी, हा संघ कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो. लखनौच्या एकना स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे.
भारताविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने इंग्लंडसमोर 230 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे. टीम इंडियाने 50 षटकांत नऊ विकेट गमावून 229 धावा केल्या. भारतीय संघ असा एकमेव संघ आहे जो या विश्वचषकात आतापर्यंत ऑलआऊट झालेला नाही. भारताकडून रोहित शर्माने कर्णधारपदाची खेळी खेळली आणि रोहितनं सर्वाधिक 87 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने 49 आणि राहुलने 39 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून डेव्हिड विलीने सर्वाधिक तीन बळी घेतले. त्याचवेळी ख्रिस वोक्स आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. मार्क वुडला एक विकेट मिळाली.
भारताचा डाव…
भारताला चौथ्या षटकात 26 धावांवर पहिला धक्का बसला. इनस्विंग बॉलवर ख्रिस वोक्सने शुभमन गिलला क्लीन बोल्ड केले. शुभमनला 13 चेंडूत 9 धावा करता आल्या. त्यानंतर लगेचच 27 च्या स्कोअरवर डेव्हिड विलीने टीम इंडियाला दुसरा धक्का बसला आहे. विराट कोहली खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. कोहली आठ चेंडूत खाते उघडू शकला नाही आणि दबावाखाली दिसत होता. डेव्हिड विलीच्या गोलंदाजीवर अन् नवव्या चेंडूवर शॉट मारण्याचा प्रयत्नात विराट स्टोक्सला झेल देऊन बसला.
12व्या षटकात 40 धावांवर भारताला तिसरा धक्का बसला. श्रेयस अय्यर 16 चेंडूत चार धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. श्रेयसला मार्क वूडने ख्रिस वोक्सकरवी झेलबाद केले. शॉर्ट बॉलवर श्रेयस पुन्हा एकदा बाद झाला. ही त्याची कमजोरी आहे आणि विश्वचषत स्पर्धेत तो या चेंडूवर अनेक वेळा बाद झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धही तो शॉर्ट बॉलवर बाद झाला होता. शॉर्ट बॉल मारण्याचा प्रयत्नात श्रेयस विकेट गमावून बसला.
भारतानं चौथी विकेट 131 धावांवर गमावली. लोकेश राहुल 58 चेंडूत 39 धावा करून बाद झाला. डेव्हिड विलीने त्याला जॉनी बेअरस्टोकरवी झेलबाद केले. रोहित आणि राहुल यांच्यात चौथ्या विकेटसाठी 91 धावांची भागिदारी झाली.
भारताला 37व्या षटकात 164 धावांवर पाचवा धक्का बसला. कर्णधार रोहित शर्मा 101 चेंडूत 10 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 87 धावा करून बाद झाला. त्याला आदिल रशीदने लिव्हिंगस्टोनच्या हाती झेलबाद केले. रोहितने सूर्यकुमारसोबत पाचव्या विकेटसाठी 33 धावांची भागीदारी केली.
भारताला 41व्या षटकात 182 धावांवर सहावा धक्का बसला. आदिल रशीदने रवींद्र जडेजाला पायचीत (एलबीडब्ल्यू आऊट) केले. त्याला 13 चेंडूत आठ धावा करता आल्या. त्यानंतर लगेगच म्हणजे भारताला 183 धावांवर सातवा धक्का बसला. मार्क वुडने मोहम्मद शमीला जोस बटलरवी झेलबाद केले. त्याला एक धाव करता आली.
भारताला 47व्या षटकात 208 धावांवर आठवा धक्का बसला. सूर्यकुमार यादवचे अर्धशतक हुकले. तो 47 चेंडूंत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 49 धावा करून बाद झाला. त्याला डेव्हिड विलीने ख्रिस वोक्सच्या हाती झेलबाद केले. त्याचवेळी जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी नवव्या विकेटसाठी 21 धावांची भागीदारी करत भारतीय संघाची धावसंख्या 229 पर्यंत नेली . शेवटच्या चेंडूवर बुमराह धावबाद झाला. त्याला 25 चेंडूत 16 धावा करता आल्या. कुलदीप नऊ धावा करून नाबाद राहिला.