चेन्नई – भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटने द्विशतक झळकावले आहे. रुटची ही शंभरावी कसोटी आहे. शंभराव्या कसोटीत द्विशतक झळकाविणारा तो क्रिकेट विश्वातील पहिला फलंदाज ठरला आहे. रुटने केलेल्या 218 धावांच्या मदतीने इंग्लंडने दुसऱ्या दिवसाअखेर 8 बाद 555 धावा केल्या.
1877 साली ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात मेलबर्नमध्ये पहिला कसोटी सामना खेळला गेला होता. तेव्हापासून आतापर्यंत एकाही खेळाडूला असा विक्रम करता आला नव्हता. यापूर्वी त्याने शुक्रवारी पहिल्या दिवशी शतक पूर्ण केले होते. त्याने दुसऱ्या दिवशी देखील त्याचा फॉर्म कायम ठेवत आर. अश्विनला षटकार खेचत आपले द्विशतक पूर्ण केले.
इंग्लंडची अवस्था 2 आऊट 48 अशी असताना ज्यो रुट मैदानात उतरला. या सिझनमध्ये फॉर्मात असलेल्या रुटने सिबलेसोबत तिसऱ्या विकेटसाठी महत्त्वाची भागिदारी केली. श्रीलंकेविरुद्धच्या दोन टेस्टमध्येही रुट जबरदस्त फॉर्मात होता. त्या सीरिजमधील पहिल्या कसोटी सामन्यात 228, तर दुसऱ्या कसोटी सामन्यात 186 धावांची खेळी केली होती. श्रीलंकेतील फॉर्मच रुटने चेन्नईतही कायम ठेवला. त्याची ही या वर्षातील दुसरी डबल सेंच्युरी आहे.
इंग्लंडने शनिवारी सकाळी 3 बाद 263 या धावसंख्येवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. जो रुट आणि बेन स्टोक्स या जोडीला भारताच्या खराब खेळाची साथ मिळाली. त्यातच स्टोक्सचे दोन झेल आणि रुटला एकदा धाव बाद करण्याची संधी भारताने गमावली. या जोडीने चौथ्या विकेटसाठी 124 धावांची भागेदारी केली. शाहबाज नदीमने स्टोक्सला 82 धावांवर बाद करत ही भागेदारी मोडली.
त्यानंतर तिसऱ्या सेशनमध्ये आर. अश्विनने पोपेला 34 धावांवर बाद केले. त्यापाठोपाठ ज्यो रुटदेखील नमिदच्या गोलंदाजीवर पायचित झाला. जो रुटने 377 चेंडूत 19 चौकार आणि 2 षटकार खेळत 218 धावांची खेळी केली. यानंतर दिवसाअखेर इंग्लंडने 8 बाद 555 धावा केल्या.
भारतीय गोलंदाजांसाठी पहिले दोन सेशन खुपच निराशाजनक राहिले. मात्र, तिसरे आणि दिवसाच्या अखेरच्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी वापसी करत इंग्लंडच्या मधळ्या आणि तळातील फलंदाजांना बाद करत आणखी मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. भारताकडून इशांत शर्मा, जसप्रित बुमराह, आर. अश्विन आणि शाहबाज नदिम यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या.
दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल जिंकण्यासाठी इंग्लंडला ही सीरिज मोठ्या फरकाने जिंकणे आवश्यक आहे. चेन्नई कसोटी सामन्यातील खेळ पाहता इंग्लंडची त्याच दिशेने वाटचाल सुरु असल्याचे दिसत आहे.
रूटचा 100व्या कसोटीत विक्रम
या सामन्यात ज्यो रूट एकापाठोपाठ एक विक्रम रचत आहेत. रुट आपला 100वा कसोटी सामना खेळत आहे. या शंभराव्या कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम रुटने रचला आहे. यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानचा फलंदाज इंझमाम उल हकच्या नावावर होता. इंझमामने आपल्या 100व्या कसोटी सामन्यात 184 धावा केल्या होत्या. पण रुटने आपल्या 100व्या कसोटीत 218 धावांची खेळी करत इंझमामचा हा विश्वविक्रम मोडीत काढला आहे. त्याच बरोबर 98, 99 आणि 100व्या कसोटीत शतक करणारा ज्यो रूट हा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.
संक्षिप्त धावफलक –
इंग्लंड पहिला डाव – 180 षटकांत 8 बाद 555 धावा. (रोरी बर्न 33, डॉमनिक सिबली 87, ज्यो रूट 218, बेन स्ट्रोक 82, डोम बेस खेळत आहे 28, जसप्रीत बुमराह 2-82, रवीचंद्रन अश्विन 2-132, इंशात शर्मा 2-52, शाहबाज नदिम 2-167).