वॉशिंग्टन – भारत सरकारने शांततामय आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अनुमती दिली पाहिजे अशी सूचना अमेरिकन संसदेच्या भारतीय घडामोडीविषयक समितीने भारत सरकारला केली आहे. अमेरिकेचे संसद सदस्य ब्रॅड शेरमन यांनी या समितीची बैठक आयोजित केली होती. त्याला रिपब्लीकन सदस्य स्टीव्ह चॅबोट हेही उपस्थित होते.
या समितीचे उपाध्यक्ष रो खन्ना यांनी अमेरिकेतील भारतीय राजदूत तरणजीतसिंग संधु यांच्याशी या विषयी संपर्क साधला आणि त्यांनी अमेरिकेच्या संसदीय समितीची भूमिका त्यांच्या कानावर घालण्यात आली.
ब्रॅड शेरमन म्हणाले की भारतीय शेतकऱ्यांच्या आंदोलन करण्याच्या हक्कांवर गदा येता कामा नये. त्यांचा या बाबतीतील अधिकार मान्य केला जावा. शेतकरी आणि पत्रकारांना इंटरनेट सेवाही प्रदान करण्यात यावी अशा सूचना आम्ही भारत सरकारला केल्या आहेत.
या संबंधात दोन्ही बाजूंमध्ये लवकरच तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्न करावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. अनेक अमेरिकन संसद सदस्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावर सुरू असलेल्या दडपशाहीच्या संबंधात उघडपणे नाराजी व चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे हे शेतकरी आंदोलन हा आता जागतिक विषय बनला आहे असे यातून स्पष्ट झाले आहे.