INDIA vs ENGLAND Test Series 2024 : इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका 25 जानेवारीपासून सुरू होत आहे. पण भारतीय संघाचा स्टार सलामीवीर पहिल्या दोन सामन्यांसाठी उपलब्ध होणार नाही.
इंग्लंडविरुद्ध 25 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी एक दिलासादायक बातमी आहे. संघाचा स्टार सलामीवीर ऋतुराज गायकवाड याचे फिटनेस अपडेट समोर आले आहे. ऋतुराज गायकवाड हा तिसऱ्या कसोटीपर्यंत तंदुरूस्त होऊन संघ निवडीसाठी उपलब्ध होऊ शकतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेदरम्यान ऋतुराज गायकवाडला दुखापत झाली. या दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत सहभागी होऊ शकला नव्हता.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील तिसरा सामना 15 ते 19 फेब्रुवारी दरम्यान राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. ऋतुराज गायकवाड या कसोटी सामन्यात निवडीसाठी उपलब्ध असेल. टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, “ऋतुराज गायकवाड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फिटनेसवर काम करत आहे. ऋतुराज सात ते दहा दिवसांनी तंदुरुस्त होईल. यानंतर ऋतुराज महाराष्ट्राकडून रणजीमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध होईल आणि सामन्यातील फिटनेस सिद्ध करेल. दुसऱ्या कसोटीनंतर ऋतुराजची राष्ट्रीय संघासाठी निवड होऊ शकते.
अभिमन्यूला मिळेल संधी …
मात्र, गायकवाडला अद्याप कसोटीत पदार्पणाची संधी मिळालेली नाही. पण रुतुराज गायकवाड एकदिवसीय आणि टी-20 मध्ये टीम इंडियाच्या सेटअपचा महत्त्वाचा भाग बनत आहे. गायकवाड याने आत्तापर्यंत भारतासाठी 6 एकदिवसीय आणि 19 टी-20 सामने खेळले आहेत.
Keshav Maharaj : ‘मी प्रभू राम आणि हनुमानाचा भक्त’, जाणून घ्या…द. आफ्रिकेचा फिरकीपटू असे का म्हणाला?
तर कसोटी मालिकेत भारताकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल सलामीची जबाबदारी सांभाळू शकतात. पहिल्या दोन सामन्यांमध्ये बॅकअप सलामीवीर म्हणून अभिमन्यू ईश्वरनला संघाचा भाग बनवले जाऊ शकते. ईश्वरन यापूर्वी इंग्लंडमध्ये बॅकअप सलामीवीर म्हणून संघाचा भाग होता. इंग्लंडविरुद्धच्या दोन दिवसीय सराव सामन्यासाठीही अभिमन्यूला भारत अ संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्धच्या चार दिवसीय सामन्यातही भारत अ संघाची जबाबदारी ईश्वरनकडेच राहणार आहे.