India vs Afghanistan T20I Series : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला 11 जानेवारीपासून मोहालीत सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी खेळाडूंचे संघात पुनरागमन झाले आहे. रोहित कर्णधार म्हणून संघात परतला आहे. पुनरागमन करणाऱ्या या दोन्ही दिग्गजांना मालिकेत अनेक विक्रम करण्याची संधी आहे. कोहली T20 मध्ये 12 हजार धावा पूर्ण करू शकतो. त्याचवेळी रोहित आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये चार हजार धावांचा आकडा गाठू शकतो.
अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत कोहलीने 35 धावा केल्या तर तो टी-20 सामन्यात 12 हजार धावा पूर्ण करू शकतो. विराटने आतापर्यंत टी-20 फॉरमॅटमध्ये चार संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. भारतीय संघाव्यतिरिक्त, तो दिल्ली, इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) कडून खेळला आहे. कोहलीने 2007 पासून या फॉरमॅटमध्ये 374 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर 41.40 च्या सरासरीने 11 हजार 965 धावा आहेत. यामध्ये विराटने 8 शतके आणि 91 अर्धशतके केली आहेत.
T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू…
अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत कोहलीने 35 धावा केल्या तर तो वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आणि केरॉन पोलार्ड आणि पाकिस्तानचा शोएब मलिक यांच्या क्लबमध्ये सामील होईल. गेलने 463 सामन्यांमध्ये सर्वाधिक 14,562 धावा केल्या आहेत. मलिकने 525 सामन्यात 12,993 धावा केल्या आहेत. तर पोलार्डने 637 सामन्यात 12,390 धावा केल्या आहेत.
कोहली गाठू शकतो आणखी एक टप्पा…
विराटने टी-20 फॉरमॅटमध्ये आतापर्यंत 99 वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. सर्वाधिक 50 पेक्षा अधिक धावा करण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. ख्रिस गेलने त्याच्या T20 कारकिर्दीत 110 वेळा 50 पेक्षा अधिक केल्या आहेत. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या स्थानावर आहे. वॉर्नरने 107 वेळा अशी कामगिरी केली आहे. कोहलीने पुन्हा एकदा 50 धावांचा टप्पा ओलांडला तर तो T20 मध्ये 50 पेक्षा अधिक (50+) धावा 100 वेळा करणारा तिसरा खेळाडू होईल.
#INDvAFG T20I Series | रोहित शर्माला कर्णधार म्हणून ‘एक’ मोठा विक्रम करण्याची संधी…
रोहित पूर्ण करू शकतो 4 हजार धावा…
या मालिकेदरम्यान कर्णधार रोहित शर्माला आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये चार हजार धावा पूर्ण करण्याची संधी असेल. त्याने 148 सामन्यात 139.24 च्या स्ट्राईक रेटने 3 हजार 853 धावा केल्या आहेत. या काळात हिटमॅनची सरासरी 31.32 होती. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत त्याने 147 धावा केल्या तर तो आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये चार हजार धावा पूर्ण करेल. त्याच्या आधी दोन खेळाडूंनी ही कामगिरी केली आहे. सुझी बेट्सच्या नावावर 152 सामन्यांमध्ये 4 हजार 118 धावा आहेत. तर विराटने 115 टी-20 सामन्यांमध्ये 4 हजार 008 धावा केल्या आहेत.
रोहित कर्णधार म्हणून करू शकतो ‘ही’ कामगिरी…
IPL 2024 : भारतात यावर्षी आयपीएल होणार नाही? समोर आलं ‘हे’ मोठं कारण…
तसेच रोहित शर्माने 5 षटकार मारताच, कर्णधार म्हणून तो आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनेल. अफगाणिस्तानविरुद्धच्या 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारतीय कर्णधार हा टप्पा गाठू शकतो. रोहित शर्माने भारताकडून टी-20 सामन्यात कर्णधार म्हणून 82 षटकार ठोकले आहेत. पण कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत इऑन मॉर्गन अव्वल आहे. इऑन मॉर्गनने कर्णधार म्हणून 86 षटकार मारले आहेत. त्याचबरोबर या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे.