IPL 2024 (RR vs CSK Match 61) : विजयासह ‘सीएसके’च्या प्लेऑफच्या आशा कायम, राजस्थानला 5 विकेट्स राखून केलं पराभूत…

IPL 2024 (RR vs CSK Match 61 Result ) : चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने राजस्थान रॉयल्सचा चेपॉकवर पाच गडी राखून पराभव करून प्लेऑफच्या दिशेने वाटचाल केली, तर राजस्थानला आणखी एक पराभवाचा सामना करावा लागला ज्यामुळे त्याचं प्लेऑफ मध्ये जाण्याचं गणित आणखी एका सामन्याने लांबलं आहे. राजस्थानचा हा सलग तिसरा पराभव आहे. तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबादने एका धावेने, तर दिल्ली कॅपिटल्सनं 20 धावांनी पराभव केला होता.
One Step Forward. 🥳🙌🏻#CSKvRR #WhistlePodu 🦁💛 pic.twitter.com/qAzqQXihO2
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 12, 2024
राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 बाद 141 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल चेन्नईने 18.2 षटकांत 5 विकेट गमावत 145 धावा करत विजयाची नोंद केली. या विजयासह चेन्नईने प्लेऑफच्या शर्यतीत स्वत:ला कायम ठेवले असून गुणतालिकेत अव्वल चारमध्ये आपले स्थान मजबूत केले आहे, तर राजस्थानची बाद फेरी गाठण्याची प्रतीक्षा वाढली आहे. चेन्नई संघ 13 सामन्यांत सात विजय आणि 6 पराभवांसह 14 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे, तर राजस्थान संघ 12 सामन्यांत 8 विजय आणि 4 पराभवांसह 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
विजयासाठी 142 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईला कर्णधार रुतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र यांनी चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 32 धावांची (22 चेंडू) भागीदारी केली. ही भागीदारी चौथ्या षटकात रचिनच्या विकेटने संपुष्टात आली. रचिनने 18 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 27 धावा केल्या. त्यानंतर संघाला दुसरा धक्का डॅरिल मिशेलच्या रूपाने 8 व्या षटकात मिळाला. मिचेलने 13 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 22 धावा केल्या.
त्यानंतर 12व्या षटकात बाद झालेल्या मोईन अलीच्या रूपाने संघाने तिसरी विकेट गमावली. मोईनने 13 चेंडूत केवळ 10 धावा केल्या. त्यानंतर 14व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अश्विनने शिवम दुबेला बाद केले. शिवमने 11 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 18 धावा केल्या. यानंतर चेन्नईला पाचवा धक्का रवींद्र जडेजाच्या रूपाने बसला, तो ‘ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड’ (क्षेत्ररक्षणात अडथळा) मुळे बाद झाला. जडेजाने 6 चेंडूत केवळ 4 धावा केल्या. यानंतर कर्णधार गायकवाड आणि समीर रिझवी यांनी सहाव्या विकेटसाठी 24* (15 चेंडू) धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला. कर्णधार रुतुराज गायकवाडने चेन्नई संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि 41 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 42* धावा केल्या. या काळात राजस्थानकडून रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक 2 बळी घेतले.
IPL 2024 (RR vs CSK Match 61) : चेपॉकमध्ये चेन्नईचे गोलंदाज चमकले, राजस्थानला 141 धावसंख्येवर रोखले
तत्पूर्वी, राजस्थानकडून प्रथम फलंदाजीला आलेले यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर यांनी पहिल्या विकेटसाठी 43 (38 चेंडू) धावांची भागीदारी केली. धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात यशस्वी जैस्वालने 7व्या षटकात आपली विकेट गमावली. सिमरजीतने जैस्वालला आपला शिकार बनवले. यशस्वीने 21 चेंडूंत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 24 धावा केल्या. त्यानंतर संथ गतीने खेळत असलेला जोस बटलरही 9व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला. सिमरजीतने बटलरलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. बटलरने 25 चेंडूत केवळ चौकारांसह 21 धावा केल्या.
त्यानंतर कर्णधार संजू आणि रियान पराग यांनी काही काळ जबाबदारी सांभाळली आणि तिसऱ्या विकेटसाठी 42 धावांची (37 चेंडू) भागीदारी केली. सिमरजीत सिंगने 15 व्या षटकात ही भागीदारी तोडली आणि सॅमसनला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. राजस्थानच्या कर्णधाराने 19 चेंडूत एकही चौकार न लावता केवळ 15 धावा केल्या. त्यानंतर वेगवान धावा काढणाऱ्या ध्रुव जुरेलच्या रूपाने 131 धावांवर राजस्थानने 20 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौथी विकेट गमावली. जुरेलने 18 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 28 धावा केल्या. यानंतर पुढच्या चेंडूवर शुभम दुबे खाते न उघडता गोल्डन डकचा बळी ठरला. रियान पराग आणि रविचंद्रन अश्विन अखेरपर्यंत नाबाद परतले. रियानने 47* आणि अश्विनने 1* धावा केली.
चेन्नईकडून सिमरजीतने तीन, तर तुषारने शेवटच्या षटकात दोन बळी घेतले. चेन्नईसाठी सिमरजीत सिंगने शानदार गोलंदाजी केली आणि राजस्थानला सुरुवातीचे आणि महत्वपूर्ण धक्के दिले, ज्यामुळे त्याच्या इतर फलंदाजांवर दबाव वाढला. यातून राजस्थानचे फलंदाज शेवटपर्यंत सावरले नाहीत आणि 150 धावाही करू शकले नाहीत.





