साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल
लाखणगाव- वाढत्या उन्हामुळे सर्वत्रच ओल्या चाऱ्याचे प्रमाण कमी झाले आहे. पावसाळ्यात सुका चारा गुरांना खाद्य म्हणून कडबा खरेदी केली जात आहे. त्यामुळे सध्या कडब्याच्या मागणीत आंबेगाव तालुक्यात वाढ झाली आहे.
तीन हजार रुपये शेकडा याप्रमाणे शेतकरी जनावरांना चारा उपलब्ध करत आहेत. आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दुग्ध व्यवसाय केला जातो. येथील शेतकऱ्यांकडे दूध उत्पादनासाठी जर्शी गायींचे संगोपन करण्यात येते. या गायींसाठी चारा म्हणून शेतकरी गवत, मका, ज्वारी, ऊस या स्वरूपाचा ओला चारा खाद्य म्हणून वापर करत असतात. अनेक शेतकरी मुरघास करून त्याचा जनावरांसाठी चारा म्हणून उपयोग करतात. सध्या येथील शेतकरी कडब्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी करू लागले आहे.
शिरूर तालुक्यातील गावांमधून तसेच नगर जिल्ह्यातील काही गावांमधून ट्रकद्वारे कडबा आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात येत आहे. सरासरी तीन हजार रुपये शेकडा याप्रमाणे कडब्याला बाजारभाव असून शेतकरीवर्ग कडबा साठवून ठेवत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात सुकाचारा म्हणून कडब्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. सध्या चाऱ्याच्या टंचाईमध्ये कडब्याचा जास्त वापर केला जातो. कडबा जनावरांच्या आरोग्यासाठी चांगला असून दुध उत्पादन वाढते. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कडब्याला मागणी असून सध्या संचार बंदी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कडबा खरेदी करणे अवघड बनले आहे.