मुंबई – उद्योगपती रतन टाटा ( Tata group ) यांना धमकीचा फोन करणाऱ्या एमबीए धारकाचा मुंबई पोलिसांनी ( Mumbai police ) शोध घेतला आहे. पोलिसांनी सांगितले की, तपासादरम्यान त्यांना कळले की अज्ञात कॉलर स्किझोफ्रेनियाने ग्रस्त आहे. मुंबई पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कॉलरने पोलिसांना रतन टाटा ( Ratan tata ) यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यास सांगितले अन्यथा टाटा यांची हालत टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांच्यासारखिच होईल अशी धमकी देखील या कॉलरने दिली. ( Ratan Tata threat call )
प्रसिद्ध उद्योगपती मिस्त्री यांचे 4 सप्टेंबर 2022 रोजी कार अपघातात निधन झाले होते. धमकीचा कॉल मिळाल्यावर, मुंबई पोलीस पूर्ण अलर्ट मोडमध्ये गेले आणि रतन टाटा यांची वैयक्तिक सुरक्षा वाढवण्याची जबाबदारी एका विशेष टीमवर सोपवली. तर दुसऱ्या टीमला कॉल करणाऱ्याची माहिती गोळा करण्यास सांगण्यात आले. तांत्रिक सहाय्य आणि दूरसंचार सेवा प्रदात्याच्या मदतीने त्यांनी कॉलरचा शोध घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. फोन करणाऱ्याचे लोकेशन कर्नाटकातील असून तो पुण्याचा रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिस कॉलरच्या पुण्यातील निवासस्थानी पोहोचले असता त्यांना फोन करणारा गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याचे समजले आणि त्यांच्या पत्नीने शहरातील भोसरी पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. फोन करणाऱ्याच्या कुटुंबीयांची चौकशी केल्यावर त्याला स्किझोफ्रेनियाचा त्रास असून त्याने न कळवता कोणाच्या तरी घरातून फोन केल्याचे निष्पन्न झाले.
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला धमकीचा कॉल
कॉलरने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून रतन टाटा यांना धमकी दिली. अधिकाऱ्याने सांगितले की कॉलरला स्किझोफ्रेनियाचा त्रास असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाई न करण्याचा निर्णय घेतला. फोन करणाऱ्याने फायनान्समध्ये एमबीए केले असून, त्याने इंजिनीअरिंगचेही शिक्षण घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली.