‘एटीएम क्‍लोनिंग’च्या घटनांमध्ये वाढ

बॅंकांकडून एमटीएम सुरक्षेकडे दुर्लक्ष : नागरिकांच्या नकळत हडप केली जातेय रक्‍कम

पिंपरी – एमटीएम मशीनमध्ये छोटा स्कॅमर व कॅमेरा लावून कार्ड क्‍लोनिंग करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. यामुळे नागरिकांच्या खात्यातील पैसे रातोरात लपांस होत आहेत. असे असूनही बॅंकांकडून एटीएमच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये पैसे अचानक गायब होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. तसेच बड्या बॅंकांच्या एटीएमचेही क्‍लोनिंग केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. शहरात उच्च तंत्रज्ञानाद्वारे फसवणुकीच्या तसेच थेट एटीएम फोडण्याच्या घडत असतानाही बॅंका मात्र एटीएम सुरक्षेकडे दुर्लक्ष करत आहेत.

असे होते कार्ड क्‍लोनिंग
ज्या ठिकाणी कार्ड स्वाइप केले जाते त्या ठिकाणी स्कॅमर लावला जातो. शक्‍यतो तो एटीएमच्या रंगाचा असल्याने अनेकदा तो समजूनही येत नाही. कार्ड स्वाइप करताना त्या ठिकाणी स्कॅनिंग होते. तसेच ज्या ठिकाणी आपण पिन क्रमांक टाकतो तेथील वरील बाजूस छोटा कॅमरा चिकटविलेला असतो. त्यामुळे चोरट्यांना पिन क्रमांक माहीत होतो. क्‍लोनिंग झालेल्या कार्डाचे बनावट कार्ड तयार केले जाते. तसेच कॅमेऱ्याच्या मदतीने चोरट्यांना पिन नंबर माहिती झालेला असल्याने ते बनावट कार्डाचा वापर करीत आपल्या बॅंक खात्यातील पैसे हातोहात लांबवितात.

हे एमटीएम होतात टार्गेट
ज्या ठिकाणी एटीएमला सुरक्षा रक्षक नाहीत, अशी एटीएम सेंटर चोरटे टार्गेट करतात. स्कॅमर आणि कॅमेरा बसविल्यानंतर दोन तास चोरटे आसपास फिरून येतात. त्यांतर जमा झालेला डेटा घेऊन जातात. साधारणतः आठवडाभराच्या आतच चोरटे विविध ठिकाणांहून बनावट एटीएम कार्डद्वारे पैसे काढतात. परंतु ज्या एटीएममध्ये पैसे काढताना मशीन कार्ड पूर्णपणे आत घेते अशा मशीन सुरक्षित मानल्या जात आहेत.

चोरटे निवडतात रात्रीची वेळ
अनेकजण रात्री लवकर झोपतात. यामुळे बहुतांशवेळा चोरटे रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास एटीएममधून पैसे काढतात. बारा वाजल्यानंतर दुसरा दिवस सुरू होतो. त्यामुळे अवघ्या थोड्याच वेळात पुन्हा पैसे काढल्याचा मेसेज येतो. रात्रीच्यावेळी येणाऱ्या मेसेजकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. सकाळी जेव्हा मेसेज पाहतात त्यावेळी खूप उशीर झालेला असतो. मात्र कार्ड आपल्याजवळ असतानाही पैसे काढल्याचा मेसेज आला तर मेसेजमध्ये असलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून कार्ड ब्लॉक केल्यास पुढील पैसे जाण्यापासून वाचतील.

गेलेले पैसे परत कसे मिळवाल?
जर तुम्ही कोणालाही ओटीपी क्रमांक दिलेला नाही आणि तरीदेखील तुमच्या बॅंक खात्यातील पैसे चोरीस गेले असतील तर तीन दिवसाच्या आत त्वरीत बॅंकेकडे तक्रार करा व बॅंकेकडून देण्यात येणारा फॉर्म भरा. तसेच पोलीस ठाण्यातही तक्रार करा. रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानुसार अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये बॅंकेने ग्राहकांना पैसे परत देणे बंधनकारक आहे.

शक्‍यतो ज्या एटीएम सेंटरला सुरक्षा रक्षक आहेत अशाच ठिकाणी पैसे काढावेत. इतर ठिकाणी पैसे काढताना ज्या ठिकाणी कार्ड स्वाइप करतात त्या ठिकाणी इतर काही चिकटविले आहे काय, तसेच ज्या ठिकाणी पिन क्रमांक टाकतो त्याच्या वरील बाजूला छोटा छुपा कॅमेरा आहे काय याची खात्री करावी. पिन नंबर टाकताना आपल्या एका हातावर दुसरा हात वर धरावा. ज्यामुळे चोरट्यांच्या वरच्या कॅमेरामध्ये पिन क्रमांक दिसणार नाही. तसेच दुकानात कार्डद्वारे पैसे देताना एटीएम कार्ड आपल्या नजरेसमोरच ठेवा. पिन क्रमांकही स्वतःच इतरांना दिसणार नाही, अशा पद्धतीने टाका. सतर्कतेमुळे संभाव्य घटना टळू शकतात.
– सुधाकर काटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक-सायबर विभाग

Leave A Reply

Your email address will not be published.