नगर, (प्रतिनिधी) – एटीएम कार्डची आदलाबदल करून सेवानिवृत्त वृध्द महिलेच्या खात्यातून २५ हजार रूपये काढून घेत त्यांची फसवणूक केल्याची घटना दिल्लीगेट परिसरात घडली. याप्रकरणी १८ ते २० वर्ष वयोगटाच्या अज्ञात युवकाविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेखा रघुनाथ घाडी (वय ७४ रा. मेहेर कॉलनी, अरणगाव ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी त्यांना मिळालेल्या पेन्शनचे पैसे काढण्यासाठी शुक्रवारी (दि. 1) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास दिल्लीगेट, चौपाटी कारंजा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेच्या जवळील एटीएम मध्ये गेल्या होत्या. तेथे त्यांच्या पाठीमागे उभा असलेल्या अनोळखी युवकाने फिर्यादीच्या जवळील एटीएम कार्ड घेऊन त्यांना त्याच्याकडील दुसरे एटीएम कार्ड दिले.
काही वेळाने फिर्यादीकडील एटीएम कार्डचा वापर करून त्यांच्या खात्यातील 25 हजार रूपये काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार सांगितला. पोलिसांनी अनोळखी युवकाविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास महिला पोलीस अंमलदार कविता गडाख करीत आहेत.