भोर, (प्रतिनिधी) – होळीच्या सणापासून उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा अन उकाडाही आता असह्य झाला आहे़. ३८.५ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद झाली़. दुपारच्या वेळेला कमाल तापमानाचा पारा वाढता असल्याने उन्हाचे चटके जाणवत आहेत. रात्रीच्या वेळेला उकाडा वाढला आहे़.
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढल्याने ग्राहकांची पावले पंखे, कुलर आणि फ्रिज खरेदी करण्यासाठी ईलेक्ट्राॅनिक्स दुकानाकडे वळू लागली आहेत. नागरिक नामांकित कंपन्यांसोबत स्थानिक उत्पादकांची उत्पादने खरेदी करताना पहावयास मिळत आहे.
रिमोटवर चालणाऱ्या पंख्यांची मागणीही वाढली आहे. अनेक जण या पंख्याची खरेदी करत आहेत रिमोटने पंखा चालू-बंद करता येत असल्याने तसेच आकर्षक रंगसंगती, लुक यामुळे असे पंखे ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. ग्राहकांना परवडेल अशा किमतीत उपलब्ध होत असल्याने टेबल फॅन,टॉवर फॅन , पंखे,कुलर,एसी विक्री होत आहे.
उन्हाळा तडाखा वाढल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. पत्र्याच्या घरात उन्हाच्या तडाख्यापुढे सर्वसाधारण पंखा कुचकामी ठरत आहे. पंख्यानेदेखील गरम हवाच लागत असल्याने कुलरची मागणी ग्रामीण भागात वाढली आहे. एसीची खरेदी आवाक्याबाहेर असणाऱ्या सामान्य नागरिकांची कुलरला पसंती दर्शवत आहेत.
उन्हाच्या तडाख्यामुळे दिवसभर कडक ऊन, रात्री होणाऱ्या प्रचंड उकाड्याला हैराण झालेल्या नागरिकांनी आता पंखे आणि कुलर खरेदीची लगबग सुरू केली आहे. परंतु ज्यांच्याकडे जुने कुलर आहेत, त्यांनी दुरूस्तीला प्राधान्य दिले आहे. तसेच पंखे दुरूस्तीचे काम सुरू आहे़.
कोट : भोर तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्राहक पंखे आणि कुलरची मागणी करीत आहेत.गेल्या दहा दिवसांत उष्णता वाढल्याने ग्राहक वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत.पंखे ८०० रुपयांपासून ३ हजार पर्यंत,कुलर २५०० पासून १२ हजारांपर्यंत तसेच एसी हे ३० हजार रुपयांहून अधिक किमंतीचे उपलब्ध आहे.
उन्हाचा पारा वाढल्याने गेल्या दहा दिवसांत विक्रमी विक्री झाली आहे. लग्नसराई सुरू असल्यामुळे एसी किंवा कुलर गिफ्ट देण्यावर ग्राहक भर देत आहेत. – योगेश विसापुरे, इलेक्ट्रॉनिक वस्तु व्यावसायिक,भोर