पुणे – शहर परिसरात हवेची गुणवत्ता ढासळत असून, प्रदूषकांमध्ये वाढ होत असल्याची नोंद अभ्यासकांनी घेतली आहे. शहराची हवेची गुणवत्ता “समाधानकारक’ पातळीवर पोहोचली असून, अधिककाळ अशा हवेच्या संपर्कात राहणे आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे मत तज्ज्ञांनी नोंदविले आहे.
शहरात लॉकडाऊन काळात बंद असलेले उद्योग, वाहतूक आणि विजेचा कमी वापर यांचा सकारात्मक परिणाम हवेच्या प्रदूषणावर झाला. त्यातच गेल्या दोन महिन्यांपासून तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहे. त्यामुळेच अद्याप थंडीदेखील प्रभावी नाही. त्यामुळे साहजिकच हवेची गुणवत्ता उत्तम राहण्यास मदत मिळाली आहे.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून शहरातील हवेची गुणवत्ता सातत्याने ढासळत आहे. हवेतील प्रदूषकांचे प्रमाण वाढत असल्याचे सफर-आयआयटीएम या संस्थेच्या नोंदीतून समोर आले आहे. संस्थेच्या नोंदीनुसार, हवेतील पीएम 10 चे प्रमाण 116 पर क्युबिक मीटर इतके, तर पीएम 2.5 चे प्रमाण 68 पर क्युबिक मीटर इतके आहे.
प्रमाण मर्यादेपेक्षा या घटकांचे प्रमाण अधिक असून, हवेची गुणवत्ता ही “समाधानकारक’ पातळीवर आहे. याव्यतिरिक्त हवेतील नायट्रोजन ऑक्साइडसारख्या इतर प्रदूषणकारी घटकांचे प्रमाणही काही प्रमाणात वाढले आहे.
देशातील प्रमुख शहरांमधील हवेची सद्यस्थिती
दिल्ली – खराब
मुंबई – समाधानकारक
अहमदाबाद – समाधानकारक
पुणे – समाधानकारक