पुणे -‘द अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस ऍण्ड सायन्सेस’ यांनी नुकतीच 95 व्या ऑस्करसाठीची जगभरातील 301 चित्रपटांची रिमाईंडर लिस्ट जाहीर केली. यामध्ये “मी वसंतराव’ या मराठी चित्रपटाचा समावेश असून, याचा मला मनापासून आनंद आहे, अशी प्रतिक्रिया गायक कै. वसंतराव देशपांडे यांचे नातू आणि गायक राहुल देशपांडे यांनी व्यक्त केली.
दिवंगत ज्येष्ठ गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या जीवनप्रवासावर “मी वसंतराव’ चित्रपट आधारित असून, ऑस्करसाठीच्या लिस्टमध्ये समावेश झाल्यामुळे सगळीकडून कौतुक होत आहे. यानिमित्ताने आम्ही केलेल्या कामाची दखल जागतिक पातळीवर घेतली जात आहे, ही अभिमानाची बाब आहे. शिवाय मराठी चित्रपट आणि संगीत सृष्टीसाठी देखील हे महत्त्वाचे आहे असे मी मानतो.
“मी वसंतराव’ हा चित्रपट एक वेगळाच प्रयोग होता. यामध्ये माझे आजोबा डॉ. वसंतराव देशपांडे यांचीच कथा मी त्यांचा नातू एक नट म्हणून घेऊन आलो आहे. त्यातील गाणी आणि संगीत दिग्दर्शन हे देखील मीच केले असल्याने हा चित्रपट माझ्यासाठी महत्त्वाचा आहे.