पुणे- महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आता विविध उपचारांप्रमाणेच मोतिबिंदूच्या शस्त्रक्रियेचा समावेश करण्याचे आश्वासन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. तसेच नेत्रदानात येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयास टोपे यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रुग्णालयाचे चेअरमन नितीन देसाई, अध्यक्ष राजेश शहा, तसेच सुधीर साबळे, मनीष जैन, राहुल राठी, मयूर व्होरा, वैद्यकीय अधीक्ष कर्नल डॉ. मदन देशपांडे, कार्यकारी संचालक परवेझ बिलिमोरिया उपस्थित होते.
यावेळी टोपे यांनी येथील रुग्णांची विचारपूस केली. लहान मुलांच्या विभागातील चष्माघराचे उद्घाटन तसेच पुणे अंधजन मंडळाचे माजी अध्यक्ष निरंजन पंड्या यांच्या “प्रकाशमार्गी’या आत्मचरित्राचे प्रकाशनही करण्यात आले. “राज्यातील अवयवदान कायद्यात बदल करून नेत्रदानातील अडचणी दूर करण्यात येतील,’ असे आश्वासन टोपे यांनी यावेळी दिले. रुग्णालयाच्या कामकाजाचा आढावा डॉ. सुचेता कुलकर्णी यांनी घेतला, तर अंधत्व निर्मूलनासाठी काय उपाययोजना करता येतील, याबाबत डॉ. कुलदीप डोळे यांनी सांगितले.