रोहित पवारांच्या हस्ते जामखेडला आरोग्य योजनेचे उद्घाटन

रुग्णांना मिळणार मोफत उपचार

जामखेड: जामखेड येथील इंदिरा हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झाले. रोहित पवार यांच्या पाठपुराव्याने हि योजना जामखेड या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहे.

आर्थिक मागासलेपणामुळे उपचार घेता न येणाऱ्या समाजातील अशा लोकांना राज्य शासनाकडून महात्मा ज्योतिबा फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमार्फत उपचार केले जातात. राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या धर्तीवर नवीन उपचारांचा सामावेश करून हि योजना राज्य शासनाकडून सुरु करण्यात आली आहे.

उद्घाटनावेळी आमदार पवार म्हणाले, ‘या योजनेचा सर्वसामान्यांपर्यत लाभ मिळवण्यासाठी लोकांनी आता पुढे येण्याची गरज आहे.कोणतेही आजार अंगावर न काढता या योजनांमार्फत उपचार तसेच गरजेनुसार शस्त्रक्रिया करून घ्याव्यात आणि प्रत्येकाने आपले आरोग्य जपावे’.

इंदिरा हॉस्पिटलमध्ये स्री रोग तज्ञ,बालरोगतज्ञ,काचेची पेटी कान,नाक, घसा,अपेंडिक्स,हाडाची शस्त्रक्रिया,अपघात,किडनीच्या सर्व शस्त्रक्रिया, हर्नियासारख्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. नवजात बालकापासून ते पंधरा वर्षांच्या मुलापर्यंत सगळ्या शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. शासनाकडून प्रस्तावित केल्याप्रमाणे डिलेव्हरी,सीझर,गर्भपात या शत्रक्रिया देखील इंदिरा हॉस्पिटलमध्ये मोफत होणार आहेत. शासनाचे नियम व अटी पाळूनच हे उपचार होणार आहेत.

या अगोदरच्या योजनेत केवळ पिवळे आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना सुविधा मिळत होत्या मात्र आत्ताच्या योजनेत सर्वच शिधापत्रिकाधारकांना या सुविधांचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे कोणत्याही अन्य कागदपत्रांचा बोजवारा न करता केवळ शिधापत्रिका आणि आधारकार्डावरच उपचार मिळणार असल्याची माहिती डॉ.सुर्यवंशी यांनी दिली.

या योजनांमुळे नागरिकांची बाहेरगावी,परजिल्ह्यात जाण्याची ससेहोलपट थांबणार आहे.त्यामुळे आर्थिक खर्चाबरोबर वेळही वाचणार असून या सेवांचा तात्काळ उपभोग घेता येणार आहे. या उद्घाटनाच्यावेळी आमदार रोहित पवार,इंदिरा हॉस्पिटलचे डॉ.सुहास सुर्यवंशी,डॉ.पल्लवी सुर्यवंशी,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनील बोराडे,डॉ.युवराज खराडे,डॉ.प्रवीण जगताप,ऑ.हर्शल डोके,संजय खरात,पोलीस निरीक्षक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


योजनेची माहिती गावस्तरावर पोहोचवावी- डॉ.सुहास सुर्यवंशी
या योजनेतून गरीब लोकांना १००% टक्के सुविधा देण्याचा मनोदय आहे. शासनाने त्या दृष्टीने सर्व परवानग्या दिलेल्या आहेत. गावातील प्रतिष्ठित,पदाधिकारी,आरोग्य सेवक आशा सेविका तसेच शासकीय घटकांनी योजनेची माहिती गाव स्तरावर देऊन आपल्या गावातील लोकांचे आरोग्य चांगले कसे राहील याचा प्रयत्न करावा, असे मत इंदिरा हॉस्पिटलचे सर्वेसर्वाडॉ.सुहास सुर्यवंशी यांनी व्यक्त केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.