नेवासे – मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली मुळा सहकारी साखर कारखान्याने 80 कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या डिस्टलरी व इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन उद्या (शुक्रवारी) दुपारी 2 वाजता पर्यटन व पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते कारखाना कार्यशाळावर होणार आहे. अध्यक्षस्थानी मुळा उद्योग समुहाचे संस्थापक व ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख असणार आहेत.
यावेळी मंत्री शंकरराव गडाख, खासदार सदाशिव लोखंडे यांची प्रमुख उपस्थित व जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. वर्षाला अडीच कोटी लिटरचे उद्दिष्ट ठेवलेल्या प्रकल्पासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सर्व निकष पाळून झिरो लिक्विड डिस्चार्ज या तत्त्वावर मल्टी इफेक्ट इव्हॅपोरेटर यंत्रणा कार्यान्वित केली आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून उत्पादित होणारा स्पेंटवॉश बॉयलर इंधन म्हणून वापरला जाणार आहे.तसेच प्रकल्पात वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा पुर्नवापर केला जाणार आहे.
केंद्र सरकारने सन 2025 पर्यंत 8 ऐवजी 20 टक्के इथेनॉल इंधन मिश्रण करायचे धोरण जाहीर केले. रोजची 1.5 लाख लिटर उत्पादनासाठी लागणारी सर्व मशिनरी, साठवण टाक्या, इमारत व नवीन बॉयलर उभारणी होऊन प्रकल्पाचे काम पुर्ण आहे. मंत्री गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली वीज निमित्ती प्रकल्प व गळीत हंगामासाठी करण्यात आला विस्तार यशस्वी झाली. डिस्टलरी व इथेनॉल प्रकल्प उभारणीनंतर सभासद, ऊस उत्पादक नेवासा तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. मंत्री ठाकरे यांचा पहिलाच दौरा असल्याने नेवासा तालुक्यासह जिल्ह्यातील शिवसैनिकांत उत्साहाचे वातावरण आहे.