नेवासा – नेवासा तालुक्यातील मुकिंदपुर आणि मुरमे येथील रहवासी असलेल्या लाभार्थ्यांना उस्थळ दुमाला (ता.नेवासा) येथे शासनाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेतंर्गत विशेष समाज कल्याण विभागाकडून शासनाच्या 50 टक्के अनुदानावर जमीनी दिलेल्या आहेत. मात्र या जमीनीची मशागत करण्यासाठी या लाभार्थ्यांना शेतीकडे जाण्यासाठी रस्ताच नसून पाटपाण्यासाठी असलेल्या चारीचे पाणीही दुसरीकडेच अडविले जात आहे. यामुळे या लाभार्थ्यांना शासनाने जमीनी देवूनही या शेतात पिके घेता येत नाहीत. त्यामुळे नेवासा तहसिलदारांनी जमीनीच्या मशागतीसाठी त्वरीत रस्ता द्यावा, पाटचाऱ्या खुल्या करुन देण्याच्या मागणीसाठी गुरुवार (दि.16) रोजी सकाळी 11 वाजता नेवासा तहसिल कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरु केले आहे.
नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला येथे शासनाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेतून अशोक योव्हाण दळवी, दत्तात्रय शांत्वन साठे, नंदू श्रीपती वाकडे, बाबासाहेब श्रीपती वाकडे, बाळासाहेब भाऊराव मोरे या लाभार्थ्यांना त्यांच्या शेजारी असलेल्या गट नंबर ३६४ मध्ये पाटपाण्यासाठी चारी आहे. तर लाभार्थ्यांच्या गट नंबर ३६२ व ३६३ मध्ये शेजारी असलेले शेतकरी या लाभार्थ्यांना जाण्या – येण्यासाठी विरोध करत असल्याचे उपोषणार्थी लाभार्थ्यांनी नेवासा तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
शासनाने आम्हाला उपजिकेसाठी दिलेल्या जमिनीची रस्ता नसल्यामुळे मशागत करता येत नाही, याशिवाय पाटचाऱ्या अडविल्यामुळे आमच्या शेतात पाणी येत नाही, त्यामुळे मागासवर्गीय शेतकऱ्यांना शासनाने जमीनी देवूनही त्या पिकविता येत नसल्यामुळे आमची उपासमार होत असून नियमाप्रमाणे आम्हाला रस्ता देवून पाटपाणी मिळावे, अन्यथा आम्ही उपोषणापासून बाजूला होणार नसल्याचा इशाराही यावेळी उपोषणार्थी लाभार्थ्यांनी दिला आहे.
इंदिरा कॉंग्रेसच्या नेवासा तालुका महीला आघाडी प्रमुख शोभा पातारे यांनी या उपोषणाला पाठींबा देवून याबाबत आपण वरिष्ठांकडे पाठपुरावा करु, असे आश्वासन दिले आहे.