डेहराडून – उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या एकूण 70 जागांसाठी 632 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यांचे भवितव्य 81 लाखांहून अधिक मतदार ठरवतील. उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी 14 फेब्रुवारी या दिवशी एकाच टप्प्यात मतदान होईल. त्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी संपली. अखेरच्या दिवशी 95 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे रिंगणात एकूण 632 उमेदवार राहिले आहेत. त्यामध्ये 136 अपक्षांचा समावेश आहे.
उत्तराखंडच्या रणधुमाळीत उतरलेल्या प्रमुख पक्षांमध्ये भाजप, कॉंग्रेस, आप, सप, बसप आणि उत्तराखंड क्रांती दलाचा समावेश आहे. त्या राज्यातील सत्तारूढ भाजपपुढे कॉंग्रेसने तगडे आव्हान उभे केले आहे. इतर पक्ष कशी कामगिरी करणार याविषयी उत्सुकता आहे. भाजप आणि कॉंग्रेसने बंडखोरी थोपवण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मात्र, त्या पक्षांना फारसे यश मिळाल्याचे दिसत नाही.
सुमारे डझनभर जागांवर भाजपमध्ये बंडखोरी झाल्याचे दिसते. तर, कॉंग्रेसमधील इच्छुकांनी अर्धा डझन जागांवर बंडखोरी केली आहे. उत्तराखंडमधील मतदानानंतर सुमारे महिनाभर उमेदवारांचा जीव टांगणीला लागणार आहे. त्या राज्यातील निवडणुकीचा निकाल 10 मार्चला जाहीर होईल.