अनिल काटे/मेणवली: लोकसभेपाठोपाठ आता राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे जोरदार वाहू लागले आहे. केंद्रात बहुमातात पुन्हा एका सत्तेत आलेल्या भाजपने आता विधानसभेसाठी मोठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सातारा जिल्ह्यातही भाजपने विधानसभेसाठी जोरदार हालचाली सुुरु केल्या असून शिवसेनेकडे असलेल्या वाई, खंडाळा महाबळेश्वर मतदार संघाचा सर्वांगीण विकास हा नुकतेच भाजपवासी झालेले मदन भोसलेच करु शकतात असा दावा शनिवारी वाई येथे पार पडलेल्या विजय संकल्प बुथ संमेलनात ना. चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. एकंदरीत मदनदादांच्या उमेदवारीवर शिक्कमोर्तब करत धनुष्यबाणाच्या जागेवर कमळाचा गनिमी कावाच चंद्रकांतदादांच्या या वक्तव्यातून स्पष्ट झाला आहे.
वाई, खंडाळा, महाबळेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी मदन भोसले यांच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवून युतीचा उमेदवार म्हणून मदन भोसले विजयश्री खेचुन आणतील असा दावा करत पूर्ण तयारी केल्याची चंद्रकांत दादा पाटील या समेलनात स्पष्ट केले. कमळाचा हा गनीमी कावा वाई मतदार संघातील शिवसेनेच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना दोन्ही दादाचा वादा चांगला जिव्हारी लागला आहे. कमळाचा हा गनिमी कावा शिवसैनिकोनी मनावर घेत आक्रमक पवित्रा घेतला असून वाई मतदार संघात येत्या वाई विधानसभा निवडणुकीत बाणाच्या जागेवर दावा सांगणाऱ्या कमळाच्या पाकळ्यांचा वेध घेण्यासाठी धनुष्यबाण धार लावून डरकाळी फोडण्यास सज्ज केला आहे.
माजी आमदार व किसन वीर कारखान्याचे विद्यमान चेअरमन मदन भोसले यांनी गेली चाळीस वर्षाच्या पक्ष निष्ठेला तिलांजली देवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हाताच्या पंजात कमळाचे फूल घेतले. मदनदादानी हाताच्या निष्ठेच्या पंजात कमळ घेतल्यापासून वाई मतदारसंघात चांगलेच रुजू व फुलू लागले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विविध विकास कामांना 60 कोटीच्या निधीला थेट देवेंद्रजींकडून मंजुरी आणल्याने वाई मतदारसंघात कमळ बहरुन नावारूपाला आले आहे.
थेट मुख्यमंत्र्यांशी संधान साधुन विकास कामाच्या जोरावर राज्याच्या सत्तेतील मित्र पक्षाला वगळून विजयी संकल्प मेळावा घेवून विजयाची भाषा करत वाई मतदारसंघात धनुष्य बाणाची धार बोथट करण्याचा भाजपाने एक कलमी कार्यक्रम आखत धनुष्य बाणाच्या हक्काच्या वाई विधानसभा मतदार संघावर गनिमी काव्याने छुपा वार सुरु केल्याची चर्चा वाई मतदारसंघात रंगली आहे. विजयी संकल्प मेळाव्यापूर्वी वाई शहरात झळकलेल्या पोस्टर्सवर फक्त कमळाचाच बोलबाला झाल्याने धनुष्य बाणाचा वाघ चांगलाच बिथरला असल्याने लवकरच भेदक डरकाळी फोडण्याच्या तयारीत आहे.
नवीन कोरा करकरीत चेहरा घेवून गनिमी कावा खेळणाऱ्या कमळाच्या पाकळ्यांचा निशाणा साधण्याच्या तयारीत आहे. वाई विधानसभेचा किल्ला आजपर्यंत धनुष्य बाणाने एकाकीपणे लढवत हाताच्या पंजाला शह दिला आहे. मग त्याच हाताच्या पंजात कमळ देवून धनुष्य बाणाला कोंडीत पकडून मित्राशीच गनिमी कावा खेळणाऱ्या कमळाला वाई मतदारसंघ सहजासहजी कसा सोडणार? असा प्रश्न शिवसैनिकानी उपस्थित केला आहे.
बाळासाहेबांच्या निष्ठेच्या व विचारांच्या धनुष्य बाणावर कोणी गनिमी कावा करून वाई मतदार संघावर दावा करणार असेल तर वाई तालुक्यातील बाळासाहेबांचे सैनिक त्याची योग्य ती दखल घेतली. लवकरच वाघाची डरकाळी वाई विधानसभेतील विरोधकांना घाम फोडणार आहे. आमच्या हक्काच्या जागेवर आमचाच हक्क अबाधित राहिल अशी प्रतिक्रिया वाईतील शिवसेनेचे नेते सुरेश चव्हाण आणि शहर प्रमुख किरण खामकर यांनी दिली.