ऍडलेड – मान्रस लेबुशेनचे शतक व त्याला साथ देत कर्णधार स्टिव्हन स्मिथने केलेली अर्धशतकी खेळी यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ऍशेस कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात आपला पहिला डाव 9 बाद 473 धावांवर घोषित केला. त्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडची दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात 2 बाद 17 अशी अवस्था केली. इंग्लंडचा संघ अद्याप 456 धावांनी पिछाडीवर असून त्यांच्यासमोर फॉलोऑनच्या नामुष्कीचा धोका निर्माण झाला आहे.
गुरुवारच्या 2 बाद 221 धावांवरून पुढे खेळ सुरू झाल्यावर लेबुशेनने आपले शतक पूर्ण केले. मात्र, त्यानंतर तो लगेचच बाद झाला. त्याने आपल्या 103 धावांच्या खेळीत तब्बल 305 चेंडूंचा सामना करताना 8 चौकार फटकावले. तो बाद झाल्यावर ट्रॅव्हीस हेड व ख्रिस ग्रीन यांनी निराशा केली. मात्र, कर्णधार स्मिथने अलेक्स केरीच्या साथीत 6 व्या गड्यासाठी 91 धावांची भागीदारी करत संघाला त्रिशतकी मजल मारून दिली. स्मिथ 93 धावांवर बाद झाला. केरी देखील अर्धशतक पूर्ण झाल्यावर लगेचच तंबूत परतला. तळात मिशेल स्टार्कने नाबाद 39 व मायकल नेसरने 35 धावांची खेळी केली व संघाला साडेचारशे धावांच्या पुढे मजल मारून दिली. ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव 9 बाद 473 धावांवर घोषित केला. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने 3 तर जेम्स अँडरसनने 2 गडी बाद केले.
इंग्लंडच्या पहिल्या डावाची सुरुवात खराब झाली. ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्कने सलामीवीर रोरी बर्न्सला 4 धावांवर बाद केले. त्यानंतर या सामन्याद्वारे कसोटी पदार्पण करणाऱ्या मायकल नेसेरने हासीब हमिदला 6 धावांवर बाद करत इंग्लंडची दुसऱ्या दिवसअखेर 2 बाद 17 धावा अशी अवस्था केली.
संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 150.4 षटकांत 9 बाद 473 धावा. (डेव्हीड वॉर्नर 95, मार्नस लेबुशेन 103, स्टिव्हन स्मिथ 93, अलेक्स केरी 51, मायकल नेसर 35, मिशेल स्टार्क 35, बेन स्टोक्स 3-113, जेम्स अँडरसन 2-58). इंग्लंड पहिला डाव – 8.4 षटकांत 2 बाद 17 धावा. (हासीब हमीद 6, रोरी बर्नस 4, ज्यो रुट खेळत आहे 5, डेव्हीड मलान खेळत आहे 1, मायकल नेसेर 1-4, मिशेल स्टार्क 1-11).