होबार्ट – प्रमुख फलंदाजांनी निराशा केल्यावरही ट्रॅव्हिस हेडचे शतक व कॅमेरून ग्रीनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलियाने ऍशेस कसोटी मालिकेतील पाचव्या व अखेरच्या कसोटीत आपल्या पहिल्या डावात शुक्रवारी पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा 6 बाद 241 धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात तब्बल 30 षटकांचा खेळ पावसामुळे वाया गेला.
इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट याने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्टुअर्ट ब्रॉड व ओली रॉबिन्सन यांच्यासह सर्व गोलंदाजांनी केलेल्या आफलातून गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाची एकवेळ 4 बाद 83 अशी बिकट स्थिती केली होती. भरात असलेला मार्नस लेबुशेन 44 धावांवर परतला. डेव्हीड वॉर्नर, उस्मान खाव्जा व स्टिव्हन स्मिथ यांनी साफ निराशा केली. मात्र, या कसोटीत संघात पुनरागमन केलेल्या ट्रॅव्हिस हेडने दमदार शतक फटकावले. त्याने कॅमेरुन ग्रीनच्या साथीत संघाचा डाव सावरला. या जोडीने पाचव्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली व संघाला द्विशतकी मजल मारुन दिली.
हेड 113 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने 101 धावांची खेळी केली. ग्रीनने आपल्या 74 धावांच्या खेळीत 109 चेंडूत 8 चौकार फटकावले. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा अलेक्स केरी 10 धावांवर खेळत असून मिशेल मार्शला अद्याप खाते उघडायचे आहे. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉड व ओली रॉबिन्सन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. मार्क वुड व ख्रिस वोक्स यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक –
ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 59.3 षटकांत 6 बाद 241 धावा. (ट्रॅव्हिस हेड 101, कॅमेरुन ग्रीन 74, मार्नस लेबुशेन 44, अलेक्स केरी खेळत आहे 10, मिशेल मार्श खेळत आहे 0, ओली रॉबिन्सन 2-24, स्टुअर्ट ब्रॉड 2-48, ख्रिस वोक्स 1-50, मार्क वुड 1-79).