होबार्ट – मानाच्या ऍशेस कसोटी मालिकेतील पाचवा व अखेरचा सामनाही यजमान ऑस्ट्रेलियानेच जिंकला व इंग्लंडचा 146 धावांनी पराभव केला. ही मालिका 4-0 अशी जिंकताना ऑस्ट्रेलियाने अशेस आपल्याकडेच राखल्या. या सामन्याचा व मालिकेचा मानकरी ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड ठरला.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 303 धावा करत पहिल्या दिवसापासूनच सामन्यावर वर्चस्व राखले होते. इंग्लंडचा पहिला डाव 188 धावांवर संपवत त्यांनी 115 धावांची मोठी आघाडी घेतली होती. दुसरा डाव मात्र, त्यांचा अत्यंत सुमार कामगिरीमुळे लवकर संपला. अलेक्स केरीच्या 49 धावांच्या जोरावर त्यांचा दुसरा डाव 155 धावांवर संपला. त्यांच्याकडे एकूण आघाडी 270 धावांची घेतली होती. विजयासाठी 271 धावांची गरज असताना इंग्लंडने आपला दुसरा डाव सरू केला.
मात्र, जॅक क्राऊली 36 व रोरी बर्न 26 यांचा अपवाद वगळता त्यांचा एकही फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा सामना करु शकला नाही. त्यांचा दुसरा डाव 38.5 षटकांत 124 धावांवर संपुष्टात आला व ऑस्ट्रेलियाने 146 धावांनी हा सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्स, स्कॉट बोलंड व कॅमेरुन ग्रीन यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. मिशेल स्टार्कने 1 बळी घेतला.