मंचर (प्रतिनिधी) – आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर अभयारण्यातील फुलपाखरू ब्लु मॉरमॉन आणि शेकरू यांच्या प्रतिकृतींचा समावेश दिल्ली येथे 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनातील चित्ररथात करण्यात आल्याची माहिती वन्य प्राणी अभ्यासक अॅड. राहुल पडवळ यांनी दिली.
“महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर आधारित होणाऱ्या संचलनातील चित्ररथात भीमाशंकरच्या संरक्षित अभयारण्यामध्ये आढळणाऱ्या राज्य फुलपाखरू ब्लु मॉरमॉन या प्रजातीच्या फुलपाखराची आठ फुटांची हलती प्रतिकृती अग्रभागी असणार आहे, तसेच भीमाशंकर अभयारण्यात आढळणाऱ्या शेकरू या राज्य प्राण्याची देखील प्रतिकृती मध्यभागी ठेवण्यात आली आहे. राज्यातील जैवविविधता जगासमोर यावी, ही संकल्पना या चित्ररथातून साकारण्यात आली आहे.
आंबेगाव तालुक्यातील या दोन महत्त्वाच्या मानकांचा संचलनातील समावेश आंबेगाव तालुक्याच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. महाराष्ट्र हे जैवविविधतेने संपन्न असे राज्य असून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी देखील महाराष्ट्र आघाडीवर आहे. युनेस्कोने मान्यता दिलेल्या सूचीमध्ये महाराष्ट्रातील प्राणी, पक्षी, तसेच अन्य जीवांसाठी राष्ट्रीय स्तरावर अभयारण्य राखीव ठेवले आहे. अनेक दुर्मिळ वनस्पती तसेच प्राण्यांच्या प्रजाती या महाराष्ट्रात आढळतात.
शेकरू हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. “हरियाल’ हे विशेष असलेले कबुतर राज्य पक्षी म्हणून घोषित करण्यात आले आहे. ब्ल्यू मॉरमॉन या विशेष प्रजातीची राज्य फुलपाखरू म्हणून घोषणा करणारे महाराष्ट्र हे प्रथम राज्य असून हे फुलपाखरू भीमाशंकर अभयारण्यात आढळते, असे सांगून वन्य प्राणी अभ्यासक ऍड. राहुल पडवळ यांनी सांगितले. या चित्ररथाची संकल्पना, सांस्कृतिक कार्य संचालनालयाची असून त्यावर अनेक कलाकार काम करीत आहेत.
चित्ररथाची वैशिष्ट्ये
यंदाच्या चित्ररथावर दर्शनी बाजूस भव्य ब्ल्यू मॉरमॉन फुलपाखराची 8 फूट उंचीची देखणी प्रतिकृती आहे, तसेच दीड फूटांचे राज्यफुल ताम्हणाचे अनेक गुच्छ दर्शविले आहेत. त्यावर इतर छोट्या फुलपाखरांच्या प्रतिमा आहेत. चित्ररथावर 15 फूट भव्य असा शेकरू राज्यप्राणी तसेच युनेस्कोच्या सूचीमध्ये समावेश असलेल्या कास पठाराची प्रतिमा दर्शविण्यात आलेली आहे. चित्ररथाच्या दर्शनी भागात कास पठारावर आढळणारा सरडा सुपारबा 3 फूट उंचीचा आहे. त्यामागे राज्यपक्षी हरियालची प्रतिमा आहे. चित्ररथाच्या अंतिम भागात वृक्षाच्या फांदीवर बसलेल्या राज्यप्राणी शेकरू व त्यामागे राज्यवृक्ष आंबा वृक्षाची प्रतिमा सुमारे 14 ते 15 फूट उंचीपर्यंत आहे. याबरोबरच दुर्मिळ माळढोक पक्षी, महाराष्ट्रात नव्याने सापडलेली खेकड्याची प्रजाती, नव्याने सापडलेला मासा, वाघ, आंबोली झरा, तसेच फ्लेमिंगो, गिधाड, घुबड या पक्ष्यांच्या 4 ते 5 फूट उंचीच्या प्रतिकृती आहेत. रचनात्मक व सुंदर कलात्मक दृष्टिकोन ग्राह्य धरून अनेक जैवविविधता दिसतील असे देखावे तयार केले आहेत.