जामखेड (प्रतिनिधी) – शहरातील लोहारदेवी मंदिर परिसरात श्री शिवप्रतिष्ठान संघटनेने २० फूट उंचीच्या रावण पुतळ्याचे दहन करण्यात आले. पुतळा पेटताच हजारोंच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या भाविकांनी जय श्रीराम’च्या जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. त्यानंतर आलेल्या भाविकांनी एक दुसऱ्याला सोने (आपट्याची पाने) देऊन विजयादशमी सण साजरा केला.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान चे संस्थापक श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेडमध्ये दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अतिशय भव्यदिव्य दसरा सोहळा साजरा करण्यात आला. दुर्गामाता दौड चे आयोजन दुर्गादेवी बाजारतळ ते लोहाराच्या देवी येथे समारोप करण्यात आला.
त्या ठिकाणी भव्य आरतीचे करण्यात आली. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुका अध्यक्ष पांडुरंग मधुकर भोसले यांनी व सर्व मावळ्यांनी श्री नागेश्वर चौक स्तंभाचे उद्घाटन करण्यात आले. दुर्गामाता दौड ते आकर्षण म्हणजे सर्व धारकरी फेटे घालून पारंपारिक वस्त्र, पथक ,ध्वज पथक, शस्त्र पथक होते.
तसेच लोहाराची देवी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आकर्षक देखावा करण्यात आला होता. यावेळी क्रांती शिवकालीन मर्दानी पथकाने लाठीकाठी तलवार दांडपट्टा याचे प्रात्यक्षिक दाखवून सुरुवात करण्यात आली व नंतर शस्त्र पूजन करण्यात आले. यानंतर प्रतिकात्मक रावणाचा वीस फुट उंचीचा पुतळा उभारण्यात आला होता.
प्रतिकात्मक रावणाचे अक्राळविक्राळ रूप व दहा तोंडे सर्वांचे आकर्षण ठरले. फटाक्यांच्या आतषबाजीत रात्री आठ वाजण्याच्या सुमारास रावणदहन करण्यात आले.