मोदींनाही घाबरणार नाही; शरद पवारांची विदर्भात गर्जना 

वाडेगाव (अकोला): राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष्य शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्याचा दौरा करत आहेत. विदर्भातील अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदार संघात आघाडीचे उमेदवार संग्राम गावंडे यांच्या प्रचारार्थ पवारांनी सभा घेतली. दरम्यान, त्यांनी भाजपवर चौफेर टीका केली.

शरद पवार म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरतोय. या दौऱ्यात मला एक चित्र दिसतंय की लोकांना परिवर्तन हवं आहे. लोक भाजपा आणि शिवसेनेवर नाराज आहेत.

याआधी देशातील सत्ताधाऱ्यांनी कधी सैन्याच्या कामगिरीचा वापर मतांसाठी केला नाही. ज्या ज्या वेळी पाकिस्तान आणि भारतात युद्ध झाले, तेव्हा प्रत्येक वेळी सैन्याने पाकिस्तानला चोख धडा शिकवला आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तर भूगोल बदलत पाकिस्तानचे विभाजन केले. मात्र त्यांनी सैन्याच्या शौर्याचे श्रेय निवडणुकीत स्वतः घेतले नाही, ते काम मोदींनी केले असल्याची टीका पवारांनी केली. 

एका ठिकाणी पंतप्रधान म्हणाले की घुसके मारूंगा.. अहो लढणार सैन्य, यांचा काय संबंध ? लोकांना वाटलं यांनीच कामगिरी केली आणि लोकसभेत यांना मत दिलं. आणि भाजपा सरकार आलं. पण आता कशाच्या आधारे निवडणूक लढवणार? असा प्रश्न देखील त्यांनी उपथित केला.

फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना मदत केली नाही. मुख्यमंत्र्यांनी कापसाला भाव देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र कापसाला भाव नाही. सोयाबीनला भाव नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की सरसकट कर्जमाफी करणार, मात्र ही घोषणाही फसवी निघाली. त्यामुळे जे आश्वासन पूर्ण करत नाहीत त्यांना खुर्चीवर राहण्याचा हक्क नाही.

एकदा कांद्याचे भाव वाढले असता लोकसभेत विरोधकांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून माझा विरोध केला. तेव्हा कांद्याच्या माळा घाला नाहीतर कवड्याच्या माळा घाला, मी शेतकऱ्यांना मदत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे मी ठणकावून सांगितले होते. मात्र आजचे राज्यकर्ते तसं करताना दिसत नाहीत.

आम्ही ठरवले आहे की आता नवी पिढी राजकारणात आणायची आहे. काँग्रेसच्या विचारांनी, गांधी, नेहरुंच्या विचारांनी हा देश बनला आहे. स्वतंत्र काळातही आपला विदर्भ घाबरला नव्हता. आता मोदींनाही आम्ही ठणकावून सांगू की तुम्हाला आम्ही घाबरणार नाही, असे आवाहन पवारांनी केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here