आबूधाबी – अजिंक्य रहाणे, शिखर धवन यांची अर्धशतकी खेळी तसेच मार्कस स्टोनीस व ऋषभ पंत यांनी केलेल्या फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा 6 गडी राखून पराभव करत दिमाखात प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला.
सामना गमावला असला तरीही बेंगळुरूने सरस धावगती राखत आपलेही प्ले-ऑफमधील स्थान निश्चित केले. आता दिल्लीचा प्ले-ऑफमध्ये मुंबई इंडियन्सविरूध्द क्वॉलिफायर 1 मध्ये सामना होईल.
दिल्लीकडूनविजयासाठी आवश्यक धावांचा पाठलाग करताना रहाणे व धवन यांनी विजयाचा पाया रचला. पंत व स्टोनीस यांनी 19व्या षटकात 154 धावा करत विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
तत्पूर्वी, रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने जणू उपांत्य लढतीचे स्वरूप आलेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात निराशाजनक खेळ केला. कर्णधार विराट कोहली, जोश फिलीप्स व ख्रिस मॉरिस यांनी पुन्हा एकदा निराशा केली. मात्र, देवदत्त पडीक्कलने अर्धशतकी तर एबी डीविलियर्सने 35 धावांची उपयुक्त खेळी करत संघाला दीडशतकी धावसंख्या उभारण्यात मोलाचा वाटा उचलला.
दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकत बंगळुरूला प्रथम फलंदाजी दिली. त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सलामीवीर जोश फिलीप्स व कर्णधार विराट कोहली यांनी पुन्हा एकदा आपली अपयशाची मालिका कायम राखली. त्याने 24 चेंडूत 2 चौकार व 1 षटकाराच्या सहाय्याने 29 धावांची खेळी केली.
त्यावेळी 13 व्या षटकांत बेंगळुरूच्या 2 बाद 82 धावा झाल्या होत्या. पडीक्कलने मात्र जबाबदारीने फलंदाजी केली. त्याने एबी डीविलियर्सच्या साथीने संघाचे शतक फलकावर लावले. त्याने आपले अर्धशतकही पूर्ण केले. त्यानंतर विनाकारण आक्रमक फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. त्याने 41 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 50 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यावर आलेल्या ख्रिस मॉरिसनेही निराशा केली. त्यानंतर शिवम दुबेने डीविलियर्सच्या साथील थोडाफार प्रतिकार केला.
डीविलियर्सही स्थिरावलेला असताना 35 धावांवर धावबाद झाला. त्याने 21 चेंडूंचा सामना करताना 1 चौकार व 2 षटकार फटकावले. दिल्लीकडून अनरीच नोर्जेने 3 तर, कागिसो रबाडाने 2 गडी बाद केले. रवीचंद्रन अश्विनने 1 गडी बाद केला. त्यातही नोर्जे व रबाडा यांनी यंदाच्या स्पर्धेतील आपला दबदबा कायम राखला. त्यांच्या गोलंदाजीमुळेच दिल्लीने बेंगळुरूला दीडशतकी धावसंख्येवर रोखण्यात यश मिळवले. या सामन्याला जवळपास उपांत्य सामन्याचेच स्वरूप आले होते.
संक्षिप्त धावफलक :
रॉयल चॅलेंजर बेंगळुरू – 20 षटकांत 7 बाद 152 धावा. (देवदत्त पडीक्कल 50, एबी डीविलियर्स 35, विराट कोहली 29, शिवम दुबे 17, अनरीच नोर्जे 3-33, कागिसो रबाडा 2-30). दिल्ली कॅपिटल्स – 19 षटकांत 4 बाद 154 धावा. (अजिंक्य रहाणे 60, शिखर धवन 54, मार्कस स्टोनीस नाबाद 10, ऋषभ पंत नाबाद 8, शाहबाज अहमद 2-26).