बॉलिवुडमध्ये सध्या “मोदी जी की बेटी’ हा चित्रपट खूपच चर्चेचा विषय बनला आहे. मात्र, या चित्रपटाविषयी अद्याप जास्त माहिती समजू शकली नाही, परंतु हा कॉमिडी ऍक्शन चित्रपट असणार आहे. या चित्रपटातून जाहिरात बनविणारे फिल्ममेकर एडी सिंह हे दिग्दर्शन क्षेत्रात पर्दापण करणार आहेत.
गोवा येथे सुरू असलेल्या एनएफडीसीच्या चित्रपट महोत्सवात या शिर्षकाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. याबाबत केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासोबत झालेल्या चर्चेवेळी सिंह यांनी माहिती दिली. दिग्दर्शक सिंह म्हणाले, तुम्हाला आणि चित्रपटसृष्टीतील काही महान व्यक्तींना भेटून आनंद झाला. यात अशा व्यक्तिंचाही समावेश आहे, ज्यांना मी प्रेरणास्थान मानतो आणि त्यांच्यासोबत काम करू इच्छितो.
तसेच सिंह म्हणाले, मी माझे सौभाग्य मानतो की, माझया आगामी कॉमिडी ऍक्शन चित्रपट असलेल्या “मोदी जी की बेटी’बाबत सर्वांपर्यत पोहोचवू शकलो. या चित्रपटाबाबत मी आताच सर्व काही सांगू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या चित्रपटात कोण-कोण कलाकार असणार याची निश्चिती झालेली नाही. परंतु चित्रपटाच्या शिर्षकामुळे या चित्रपटाबाबत प्रेक्षकांची आतापासूनच उत्सुकात वाढली आहे.