मध्यावधी निवडणुका झाल्यास “भाजपा’लाच जनादेश मिळेल

पिंपरी – राज्यातील जनतेने महायुतीला जनादेश दिलेला असतानाही शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यात अस्थितरता निर्माण झाली आहे. राज्यात अजूनही महायुतीचेच सरकार येईल, असा विश्‍वास वाटत आहे. मात्र भाजपाने मध्यावधी निवडणुकांची तयारी सुरू केली असून मध्यावधी निवडणुका झाल्यास राज्यातील जनता भारतीय जनता पक्षालाच पुन्हा जनादेश देईल, असा विश्‍वास राज्यसभेतील खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केला.

एका पत्रकार परिषदेनिमित्त साबळे हे मोरवाडी येथे आले होते. तेव्हा पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी वरील वक्तव्य केले. पुढे बोलताना साबळे म्हणाले, गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नेत्रदीपक कामगिरी करण्यात यश आले.

त्यामुळेच जनतेने महायुतीला पुन्हा एकदा बहुमत दिले. मात्र शिवसेनेने अचानकपणे वेगळी भूमिका घेतली. ज्या कॉंग्रेसने शिवसेना आणि भाजपावर “भगवा दहशतवाद’ पसरवित असल्याचे आरोप केले त्यांच्यासोबत शिवसेना सत्ता कशी स्थापन करणार हा खरा प्रश्‍न आहे. दिल्लीतील आदेश ज्यांना मान्य नव्हते तेच आता दिल्लीच्या आदेशाची प्रतीक्षा करत आहेत. दिल्लीसोबत त्यांना शरद पवार यांच्या घराचेही उंबरठे झिजवावे लागणार आहेत. त्यामुळे हे सरकार अस्तित्वात आल्यास फार काळ टिकणार नसल्याचेही साबळे म्हणाले.

भारतीय जनता पक्ष हा देशातील लोकशाही पाळणारा एकमेव पक्ष असून एकाच घराची सत्ता या पक्षावर कधीही रहिलेली नाही. दर तीन वर्षांनी या पक्षात अंतर्गत निवडणुका होतात. साधनसुचिता पाळणारा हा पक्ष असून फोडाफोडीचे राजकारण आम्ही कधीच करणार नसल्याचेही साबळे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कामांमुळेच राज्यात पुन्हा जनतेने महायुतीला जनादेश दिला. यामुळे मुख्यमंत्री फडणवीस हेच होणे आवश्‍यक आहे. भाजपाचे गटनेते फडणवीस असून ते मुख्यमंत्री होण्यात गैर काहीच नाही. शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावरून जनादेशाचा अवमान केला आहे.

“भाजपा’लाच जनादेश मिळेल
महायुतीचे सरकार यावे, ही या राज्यातील जनतेसोबतच आमचीही इच्छा आहे. राज्याची वाटचाल अस्थिरतेकडे सुरू असून राष्ट्रपतील राजवट लागू झाल्यास काही महिन्यांत पुन्हा मध्यावधी निवडणुका होण्याची शक्‍यता आहे. भारतीय जनता पक्षाने मध्यावधीचीही तयारी सुरू केली असून मध्यावधी निवडणुका झाल्यास भारतीय जनता पक्षाला एकहाती सत्ता मिळेल, असा विश्‍वासही साबळे यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.