पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील नागरिकांचे जीवन सुखकर व्हावे म्हणून प्रशस्त रस्ते, नियोजन करून सोयीसुविधा राबविला आहेत. परंतु आज प्रशासकीय राजवटीमध्ये नियोजनशून्य कारभारामुळे शहरातील महत्त्वाचा असा स्पाइन रोड समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. याकडे महापालिका प्रशासन व वाहतूक विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांसह वाहनचालक त्रस्त आहेत.
जुना मुंबई-पुणे मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून स्पाइन रोडची निर्मिती करण्यात आली. परंतु हा रोड देखील काही मीटरचे काम करणे कित्येक वर्षांपासून बाकी असल्याने पूर्ण क्षमतेने सुरू नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून देखील 300 मीटर जागेचे संपादन करून रोड करण्यासाठी हा रस्ता आज पूर्ण क्षमतेने वापरता येत नाही. त्यामुळे प्रशस्त रस्ता आज अवजड वाहनांसाठी पार्किंग सेंटर बनला आहे. चिखली येथील स्पाइन रोडच्या सर्व्हिस रस्त्याला बेकायदा पार्किंगचा विळखा पडला आहे. एकीकडे आधीच अनधिकृतपणे थाटलेली हॉटेल, गॅरेज, दुकाने, हॉस्पिटल असताना दुसरीकडे फोरव्हीलर, रिक्षा, टेम्पो तसेच बेवारस वाहने पार्क केल्यामुळे सर्व्हिस रोडचा श्वास गुदमरत आहे.
खासगी अस्थापनांना नाही पार्किंग व्यवस्था
चिखली प्राधिकरण परिसरात अनेक ठिकाणी बेकायदा वाहने लावली जात असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या कोंडीमुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरातील अनेक गृहसंकुले, हॉटेलांना पार्किंगची व्यवस्था नाही. अनेक फोर-व्हिलर व टू-व्हिलर वाहने ही सर्व्हिस रोडवर पार्क केली जातात. त्यात बेवारस वाहनांचीही भर पडत आहे. गॅरेज व टपऱ्यांमुळे एकीकडे दुचाकी वाहने, तर दुसऱ्या बाजूला फोरव्हिलर वाहनांचे पार्किंग केले जात आहे.
बेकायदा बांधकामांचे पेव
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण सर्व सोयींनी सुसज्ज व टाऊन प्लॅनिंग असलेले शहर वसविण्यासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. त्या पद्धतीने पिंपरी चिंचवड शहरात अनेक ठिकाणी नवनिर्मिती केली आहे. परंतु नागरिकांनी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर व्यावसायिक वापरासाठी इमारतीच्या मूळ स्ट्रक्चरमध्ये बदल करून प्राधिकरणाच्या सुसज्ज नवनिर्माण शहराच्या उद्दिष्टाला बाजूला सारत बेकायदेशीर बांधकामे केली आहेत. प्राधिकरणाच्या हद्दीत असलेल्या इमारतींवर निरंतर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असताना सुद्धा प्रशासन कानाडोळा करत असल्याने बेकायदा बांधकामांमध्ये वाढ झाली आहे.
अपघातांचे प्रमाण वाढले
स्पाइन रोडचा सर्व्हिस रस्ता सध्या अनधिकृत पार्किंगच्या विळख्यात अडकला आहे. या अनधिकृत वाहन पार्किंगमुळे बऱ्याच नागरिकांना व वाहनचालकांना आपला जीव गमवावा लागला आहे. परंतु वाहतूक पोलीस व महापालिका प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने दिवसेंदिवस हा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात येत आहे. घरकुल चौक, भाजी मार्केट चौक आदी भागात व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. परंतु प्रशासकीय अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत.
वाहनांच्या रहदारीत सुलभता यावी यासाठी मोठमोठे रस्ते निर्माण केले. मात्र, या रस्त्यांच्या दुतर्फा बेकायदा चारचाकी तसेच तीनचाकी वाहने पार्क केली जात आहेत. या संदर्भात अनेक नागरिकांनी तक्रारीही केल्या आहेत. प्रशासन मात्र याची दखल घेत नसल्याने नागरिकांना हकनाक मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याचा विचार प्रशासनाने करावा.
– शिवानंद चौगुले, नागरिक.
स्पाइन रोडवरील सर्व्हिस रस्त्यावरील अनधिकृत वाहन पार्किंगवर कारवाई करावी. घरकुल चौक अति मोठा झाल्याने वाहनचालकांना त्रास होत आहे. बहुतांश वेळा सिग्नल बंद असल्याने वाहतूक कोंडी होते. यावर महापालिका आणि वाहतूक विभागाने संयुक्त कारवाई करणे आवश्यक आहे.
– सारिका पवार, अध्यक्षा एकता प्रतिष्ठाण, पूर्णानगर.