पुणे – शहरात जाहिरात फलक (होर्डिग्ज) उभारण्यासाठी कागदोपत्री महापालिकेची परवानगी घेऊन प्रत्यक्षात जागेवर मोठ्या प्रमाणात नियमांना पायदळी तुडवित वृक्षतोड, धोकादायक तसेच परवानगी पेक्षा अधिक मोठे जाहिरात फलक उभारण्यात येत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील नदीपात्रात हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महापालिकेने आता नव्याने परवानगी दिलेल्या सर्वच जाहिरात फलकांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
नदीपात्रातील या जाहिरात फलकामुळे इतर सर्वच फलकांची तपासणी होणार असल्याने अनेक नियमाबाह्य फलक समोर येण्याची शक्यता आहे. परिणामी, नियम मोडल्याचे आढळल्यास व्यावसायिकासह, जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही कारवाई केली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली.
शहरात महापालिकेने परवानगी दिलेले सुमारे 2 हजार 348 जाहिरात फलक असून त्यांना 2022 मध्ये शासनाच्या सुधारीत नियमानुसार, परवानगी दिली जाते. त्यानुसार होर्डिंगची उंची, दोन होर्डिंगमधील अंतर, लोखंडी सांगड्याची मजबुती, जाहिरातीचा रंग, प्रतिबंधित ठिकाणे यासह इतर नियमांचा स्पष्ट उल्लेख आहे.
हे आहेत काही प्रमुख नियम
- नदीपात्र, तलाव, कॅनॉल येथे जाहिरात फलक उभारता येणार नाहीत
- सार्वजनिक मैदाने, क्रीडांगणे, उद्यान येथे उभारता येणार नाही.
- पृष्ठभागापासून 40 फुटापेक्षा उंची असू नये
- एकावर दुसरा फलक उभारला येणार नाही
- प्रत्येक फलकासाठी स्वतंत्र सांगाडा असावा
- दोन फलकांमध्ये एक मीटर पेक्षा अधिक अंतर असावे