दौंड-सिद्धटेक रस्त्यावर विद्यार्थ्यांचे हाल
देऊळगावराजे – दौंड तालुक्याच्या पूर्व भागात एसटी महामंडळच्या गाड्या वेळेवर येत नसल्यामुळे येथील विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल होत आहेत. दौंड तालुक्यातील खोरवडी, आलेगाव, देऊळगावराजे, पेडगाव, सिद्धटेक, हिंगणीबेर्डी येथील विद्यार्थी शालेय शिक्षण घेण्यासाठी दौंड येथे येत असतात; पण मध्यंतरी शाळा-महाविद्यालयांना दिवाळीच्या सुटी असल्यामुळे काही दिवस विद्यार्थी घरी होते. त्यामुळे चालू असलेली शटल गाडी बंद करण्यात आली होती, असे शिरापूर (ता. दौंड) येथे उपस्थित असलेल्या शालेय विद्यार्थीनी सांगितले.
दिवाळीची सुटी संपून शाळा सुरू झाली आहे, त्याला आता आठ दिवस झाले आहेत. मात्र, एसटी वेळेवर येत नसल्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होत आहे, त्यामुळे लवकरात लवकर एसटी महामंडळने विद्यार्थ्यांसाठी ही शटल (एसटी) बस लवकरात उपलब्ध करून द्यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी असणारी ही बस सुरू झाली नाही तर विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या वतीने दौंड-सिद्धटेक रस्त्यावर आंदोलन करण्यात येईल, असे शिरापूरचे उपसरपंच केशव काळे यांनी सांगितले.
सध्या सिद्धटेक-दौंड शटल ही एक एसटी बस सुरू असून, येत्या काळात विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेऊन एसटी बसचे नियोजन करण्यात येईल.
– आर. डी. मगर, दौंड आगार प्रमुख