संकलनात घट; गरजेनुसार प्राधान्य
पुणे – ससून रुग्णालयातील “मिल्क बॅंक’ नवजात बाळांसाठी संजीवनी ठरत आहे. मात्र, करोना संसर्गामुळे मिल्क बॅंकेत दररोज होणाऱ्या मातृदूध संकलनात घट झाली आहे. त्यामुळे काहीशा तुटवडा जाणवत असला तरी, ज्या बाळांना दुधाची आवश्यकता आहे, त्यांना मिल्क बॅंकेतून दुध देण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे या करोना काळातही “मिल्क बॅंक’ नवजात बाळांसाठी मातृत्वाचा आधार ठरत आहे.
ससून रुग्णालयात 2013 मध्ये “मिल्क बॅंक’ सुरू करण्यात आली. या बॅंकेत रुग्णालयात बाळाची नियमित तपासणीसाठी येणाऱ्या “आईचे दूध’ दान स्वरूपात घेतले जाते. या दुग्धपेढीत आतापर्यंत सरासरी साडेतीन ते चार हजाराहून अधिक मातांकडून दुग्धदान करण्यात आले आहे. ज्याचा लाभ नवजात शिशू, अतिदक्षता विभागातील कमी वजनाच्या बाळांना होतो.
आजपर्यंत या मातृदुग्ध पेढीने सरासरी प्रतिवर्षी 415 लिटर दुग्ध संकलन केलेले आहे. त्यामध्ये आणखी वाढ व्हावी यासाठी ऑगस्ट 2016 पासून मातृदुग्ध संकलन वाहन (ह्युमन मिल्क कलेक्शन व्हॅन) सुरू करण्यात आली आहे. या संकल्पातून सरासरी प्रतिवर्षी 65 लिटर दूध संकलित केले आहे. तर या दुग्धपेढीचा लाभ जून 2017 पासून सोफोश या अनाथ संस्थेतील बालकांना होत आहे.
मार्च 2020 पूर्वी (करोना संसर्गाच्या आधी) मिल्क बॅंकेत दररोज तीन ते चार कधीकधी पाच लिटर दूध संकलन होत असे. मात्र, करोनाचा संसर्ग सुरू झाला आणि हळूहळू दूध संकलनात घट झाली. करोनाचा धोका गर्भवतींना अधिक आहे. त्यामुळे प्रसुतीसाठी रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक महिलेची करोना चाचणी केली जाते. त्यामध्ये अहवाल पॉझिटिव्ह असेल तर आई आणि बाळाला वेगळे ठेवले जाते. तर अशा बाळांना दूध देतानाही सर्व सुरक्षितता बाळगली जाते. दरम्यान, करोनामुळे मातांनी स्वत:ची आणि बाळाची खबरदारी घेऊन दुग्ध दान करावे, असे आवाहन केले जात आहे.