बाबरी प्रकरणात मी निर्दोष – कल्याणसिंह यांचा दावा

लखनौ- बाबरी मशिद पतन प्रकरणी तत्कालिन कॉंग्रेसच्या सरकारने आपल्याविरोधात खोटे आणि बिनबुडाचे आरोप केले आणि केवळ राजकीय वैमनस्यातूनच आपल्याविरोधात खटला दाखल करण्यात आला असल्याचा आरोप उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी केला आहे. बाबरी पतन प्रकरणात आपण पूर्ण निर्दोष असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. बाबरी मशिद पतन प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयातील सुनावणीला उपस्थित राहिल्यानंतर पत्रकारांबरोबर ते बोलत होते.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना आपण आणि आपल्या सरकारने वादग्रस्त ढाच्याच्या संरक्षणासाठी त्रिस्तरीय संरक्षण यंत्रणा उभारली होती, असे कल्याण सिंहांनी सांगितले. जवळपास तीन तास चौकशी झाल्यानंतर बाहेर पडताना कल्याणसिंहांना दोघांच्या आधाराची गरज भासली. आपल्याला या प्रकरणात गुंतवण्यात आले आहे. मी निर्दोष आहे, असेच ते म्हणत होते.

अजूनही जबाब नोंदवण्याचेच काम सुरू                                                                                                    1992 साली बाबरी मशिद पाडली गेल्याप्रकरणी सीबीआय कोर्टामध्ये सध्या आरोपींचे जबाब नोंदवले जात आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचा जबाब नोंदवणे अद्याप बाकी आहे. तर रामचंद्र खत्री हा एका अन्य प्रकरणात हरियाणातील सोनिपत कारागृहात आहे.

या सर्वांचे जबाब व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून नोंदवण्याची योजना केली जाणार आहे. तर ओम प्रकाश पांडे हा साधू झाला असून कित्येक वर्षांपासून घरी परतलेला नाही, असे त्याच्या घरच्यांनी सांगितले. त्यामुळे तो बेपत्ता असल्याचे सीबीआयने म्हटले आहे. त्याचा शोध घेण्याची सूचना कोर्टाने सीबीआयला केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.