पुणे – जागतिक स्तरावर आता ६-जी तंत्रज्ञानाची चर्चा सुरू आहे. त्यातच दूरसंचार विभागाने नियुक्त केलेल्या समितीने अभियांत्रिकी विद्याशाखेतील पदव्युत्तर (एम.टेक.), पीएच.डी. अभ्यासक्रम अद्ययावत करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे ६-जी तंत्रज्ञानाच्या उद्योगन्मुख क्षेत्रासाठी दोन्ही अभ्यासक्रम अद्ययावत करण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील विद्यापीठे व महाविद्यालयांना केली आहे.
सध्या तंत्रज्ञानाची नवी पिढी जगापुढे येते. त्यामुळे संवादाची पद्धत बदलते. सध्या ५-जी नेटवर्क अत्यंत वेगाने कार्यान्वित करण्यात येत आहे आणि जगात आता ६-जीची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे देशात ६-जी सेवा देशात सुरू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत -जी भविष्यवेधी आराखडा २२ मार्च रोजी सादर केला. तसेच ६-जी संशोधन आणि विकासात्मक सुविधाही सादर केली.
देशात ६जीसाठी कृती कार्यक्रम निश्चित करण्यासाठी सहा कृती दलांची स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान, दूरसंचाराशी संबंधित अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचा आढावा घेण्यासाठी दूरसंचार विभागाने समिती नियुक्त केली होती. या समितीने ऑप्टिकल कम्युनिकेशन्स, सॅटेलाइट कम्युनिकेशन्स, ब्रॉडकास्टिंग, आरएफ इंजिनियरिंग, टेलिकॉम स्टँडर्डायझेशन, आयपीआर अशा विविध क्षेत्रांमध्ये ६जीच्या गरजा लक्षात घेऊन काही महत्त्वपूर्ण शिफारसी केल्या आहेत.
महत्त्वपूर्ण शिफारसी
- एम.टेक. आणि पीएच.डी. अभ्यासक्रम अद्ययावत करणे
- विद्यार्थ्यांना कम्युनिकेशनच्या क्षेत्रातील अन्य पर्यायी विषय उपलब्ध करून द्यावेत
- अभ्यासक्रम कालसुसंगत राहण्यासाठी ठराविक काळाने त्यात बदल करावेत
- शिक्षण संस्थांमध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती करणे
- आयआयटीसह आघााडी शिक्षण संस्थांमध्ये एम.टेक. पीएच.डीच्या जागा वाढवाव्यात, संशोधनासाठी सहकार्य करणे