नेवासा – नगरपंचायतीच्या भोंगळ कारभाराविरोधात नेवासा आम आदमी पार्टीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या असहकार आंदोलनास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी ‘आप’ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरात फिरून कर न भरण्याचे आवाहन करणारी पत्रके वाटली.
नेवासा नगर पंचायत नागरिकांकडून मालमत्ता, पाणी, स्वच्छ्ता, आरोग्य, शिक्षण, रस्ते आदी मूलभूत तसेच पायाभूत सुविधा देण्याच्या बदल्यात विविध प्रकारचे कर वसूल करत असतात. प्रत्यक्षात कुठल्याही सुविधा देत नसल्याचा आरोप ‘आप’च्या वतीने नगर पंचायत प्रशासनाला दिलेल्या निवेदनात करण्यात आला. पाणी पुरवठा आणि स्वच्छता हे दोन कळीचे मुद्दे बनल्याकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. शहराला उकिरड्याचे स्वरूप आल्याकडे त्यांनी लक्ष वेधून पाणी पुरवठा आणि स्वच्छतेवर दरवर्षी होत असलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च कागदावरच रहात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
तालुक्याचे ठिकाण असलेल्या नेवासा शहरात रविवार आठवडे बाजारच्या माध्यमातून मोठा महसूल मिळत असतानाही बाजारकरुंना अक्षरशः घाणीच्या साम्राज्यात वावरावे लागत असल्याची बाब ‘आप’ने निदर्शनास आणून दिली आहे. साधी स्वच्छ्ता गृहाची व्यवस्था करण्यात अपयश आल्याचा टोला लगावला आहे.
थकीत करांवर केली जाणारी 24 टक्के व्याज आकारणी ही अवास्तव तसेच निव्वळ मनमानी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे जोपर्यंत नगर पंचायत प्रशासन शहरात मूलभूत व पायाभूत सुविधा निर्माण करत नाही, तोपर्यंत नागरिक तसेच व्यावसायिकांनी कुठलेही कर देऊ नयेत, असे आवाहन करण्यात आले.
‘आप’चे जिल्हाध्यक्ष राजू आघाव, ॲड.सादिक शिलेदार, संदीप आलवणे, सलिम सय्यद, विठ्ठल मैंदाड, करिम सय्यद, देवराम सरोदे, किरण भालेराव, प्रवीण तिरोडकर, बाळासाहेब साळवे, अनिल तांदळे, अण्णा लोंढे, बापूसाहेब अढागळे, अय्युब पठाण आदी या असहकार आंदोलनात सहभागी झाले.