सिडनी – भारतीय संघाबाबत क्विन्सलॅण्ड्सच्या आरोग्य मंत्री रोझ बेट्स यांनी केलेल्या वक्तव्यावर बीसीसीआयने संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे येथे होत असलेला तिसरा कसोटी सामना संपल्यावर भारतीय संघ चौथ्या सामन्यावर बहिष्कार टाकून मायदेशी परतणार असल्याचे सांगितिले जात आहे.
अर्थात, याबाबत बीसीसीआयने अधिकृतरीत्या कोणतेही विधान केले नसले तरीही ऑस्ट्रेलिया सरकार, क्रिकेट मंडळ व बेट्स यांच्याबाबतची नाराजी उघडपणे व्यक्त केली गेली असल्याने ही मालिका तीनच कसोटी सामन्यांची होणार असे संकेत मिळत आहेत.
या दोन संघातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना येत्या गुरुवारपासून येथे होणार आहे. तर चौथा व अखेरचा कसोटी सामना ब्रिसबेन येथील गाब्बा मैदानावर होणार आहे. भारतीय खेळाडूंनी ब्रिस्बेनमध्ये दाखल झाल्यावर सर्व नियम पाळले पाहिजेत. जर तसे होणार नसेल त्यांनी ब्रिसबेनला येऊच नये, असे वक्तव्य बेट्स यांनी केले होते.
बेट्स यांच्या या वक्तव्यावर बीसीसीआय संतप्त झाली आहे. या वक्तव्याने भारतीय क्रिकेटच्या प्रतिमेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे आता ही चार कसोटी सामन्यांची मालिका तिसऱ्या सामन्यानंतरच संपुष्टात आणण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. ब्रिस्बेनमधील विलगीकरणाच्या नियमावर भारतीय संघातील खेळाडू नाराज आहेत. भारतीय खेळाडूंनी सक्तीच्या विलगीकरणाला विरोध केला आहे. खेळाडूंच्या मते ते गेल्या सहा महिन्यांपासून बायोबबल तसेच विलगीकरणात आहेत.
बीसीसीआयकडून अद्याप खुलासा नाही
ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले यांनी बीसीसीआयकडून अधिकृतरीत्या अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही, असे स्पष्ट केले आहे. बीसीसीआयने बिस्बेन कसोटीबाबत अधिकृतपणे काहीच सांगिले नाही. त्यामुळे मालिका नियोजनानुसारच होईल, असेही ते म्हणाले.