पिंपरी, दि. 4 (प्रतिनिधी) – गेल्या दोन-तीन वर्षांत वाहन इंधनांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. परिणामी नागरिक इलक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. पर्यावरण पूरक अशा या ई वाहनांची पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालात दसरा ते दिवाळी या काळात मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली असून ई वाहन नोंदणीत राज्यात द्वितीय क्रमांकाचे शहर ठरले आहे. मात्र, शहरात सध्या महावितरणचे दुचाकीसाठी एकही सार्वजनिक ई व्हेइकल चार्जिंग स्टेशन नाही. चार्जिंग स्टेशनसाठी पिंपरी आणि भोसरी या दोन्ही विभागातून 15 अर्ज प्राप्त झाले आहेत.
केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात पर्यावरण पूरक इलक्ट्रिक वाहन खरेदीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. ग्राहकांना त्यात सबसिडीही मिळत आहे. तसेच रोजच्या इंधनाची कटकट नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत होत असल्याने ग्राहकांचा या वाहनांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, पिंपरी चिंचवड शहरात या वाहनांच्या चार्जिंगसाठी सार्वजनिक ठिकाणी सुविधाच नाही. त्यामुळे अनेकजण आपल्या घरातच वाहनाची बॅटरी काढून वाहन चार्ज करत आहेत. एकदा बॅटरी पूर्ण चार्ज झाली की, सुमारे शंभर किलोमीटर वाहन चालते. त्यामुळे शहरात फिरण्यासाठी या वाहनांना मोठी मागणी आहे. मात्र, चार्जिंग करणे लक्षात आले नाही, किंवा मध्येच वाहन बंद पडल्यास ते ढकलण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शहरात चार्जिंग स्टेशनची गरज आहे.
महावितरणकडून पुण्यात काही महिन्यांपूर्वी ई-वाहन चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. मात्र, पिंपरी चिंचवडकडे अद्यापही दुर्लक्ष केले आहे. महावितरणणे पिंपरी चिंचवड शहरात प्राधान्याने दुचाकी ई व्हेइकल स्टेशनची उभारणी करावी, अशी वाहनधारकांची मागणी आहे.
पिंपरी विभागात ई-व्हेइकल चार्जिंग स्टेशनसाठी 13 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील 3 अर्जदारांना कोटेशन देण्यात आले आहे. 3 अर्जांच्या तांत्रिक बाबी तपासण्यात येत आहेत. भोसरी विभागात 2 अर्ज प्राप्त झालेले आहेत. अर्जांची छाननी करून निर्णय घेण्यात येईल.
– भारत पवार, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण.