पिंपरी – लिव्ह अॅण्ड रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका महिलेवर वेगवेगळ्या लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार करण्यात आले. तसेच चालत्या दुचाकीवरून तिला ढकलून दिले. ही घटना डिसेंबर 2018 पासून 29 जुलै 2020 या कालावधीत पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी घडली आहे.
नागेश गुरुनाथ नंदरागे (रा. कलावती नगर, सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी 40 वर्षीय महिलेने सोलापूरमधील एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिथून हा गुन्हा पिंपरी-चिंचवड मधील निगडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या पतीचे निधन झाले असून, ती आकुर्डी परिसरात राहत होती.
त्यावेळी आरोपी नागेश हा तिच्या संपर्कात आला. त्यानंतर ती मुलांसह त्याच्यासोबत लिव्ह अॅण्ड रिलेशनशीपमध्ये राहत होती. आरोपी नागेश याने महिलेला गंगानगर आकुर्डी, हिंजवडी, दहिटणे, अक्कलकोट रोड सोलापूर, तुळजापूर आणि पंढरपूर येथील वेगवेगळ्या लॉजवर नेऊन जबरदस्तीने शरीरसंबध ठेवले. त्यानंतर 27 जुलै रोजी सोलापूर शहरात दुचाकीवरून जात असताना नागेश याने महिलेला दुचाकीवरून धक्का देऊन खाली पाडले. यामध्ये महिलेच्या डोक्याला, तोंडाला, कमरेला गंभीर दुखापत झाली.
याबाबत महिलेने सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुचाकीवरून ढकलल्याची तसेच लैंगिक अत्याचाराची फिर्याद दिली. लैंगिक अत्याचाराच्या घटनेची सुरुवात आकुर्डी येथून सुरु झाल्याने हा गुन्हा सोलापूर एमआयडीसी पोलिसांनी निगडी पोलिसांकडे वर्ग केला आहे.