लासलगावमध्ये लाल कांद्याने गाठला आठ हजारांचा टप्पा

जुना गावठी कांदा अकरा हजारांवर
मनमाड :  देशासह परदेशातही सध्या कांद्याला वाढती मागणी असल्याने त्याला विक्रमी दर मिळत आहे. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये नवीन लाल कांदा दाखल झाला आहे. या नवीन लाल कांद्याने लासलगाव बाजार समितीत प्रति क्विंटल आठ हजारांचा टप्पा पार केला आहे. तर जुना गावठी कांदा तब्बल अकरा हजारांवर पोहोचला आहे.

अवकाळी पावसामुळे कांद्याचे अनेक भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर काही ठिकाणी अवकाळीचा फटका बसला. यामुळे सध्या नवीन कांदा बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र देशातंर्गत आणि परदेशात कांद्याची मागणी वाढल्याने कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

लासलगाव बाजार समितीत आज सकाळच्या सत्रात नवीन कांद्याला 8152 रुपयांचा सर्वोच्च, तर सरासरी 7100 रुपये दर मिळाला. हीच परिस्थिती नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीत कमी अधिक फरकाने पाहायला मिळत आहे. कळवण बाजार समितीत तर जुना गावठी कांदा अकरा हजारांवर जाऊन पोहोचला आहे. अनेक वर्षानंतर हा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे खुल्यात बाजारात कांद्याचे दर शंभरी पार करुन गेल्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात मात्र पाणी आले आहे.

शेतकऱ्यांकडील शिल्लक जुना कांदा बऱ्यापैकी कमी होत आहे. तर अवकाळी पावसामुळे नवीन कांद्याचे बऱ्यापैकी नुकसान झाले. त्यामुळे नवीन कांदा अल्प प्रमाणात बाजारात विक्रीला येत आहे. त्यामुळे साहजिकच कांद्याच्या दरात रोज चढ-उतार होत आहेत.

इजिप्तचा कांदा दाखल
देशातील काद्यांची टंचाई पाहता केंद्र सरकारने कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. लासलगाव बाजार समितीत एका व्यापाऱ्याने इजिप्तचा शिल्लक असलेला कांदा विक्रीला आणला आहे. शिल्लक कांद्यापैकी तीस क्विंटल कांदा काल लासलगाव बाजार समितीत विक्रीला आला असता स्थानिक व्यापाऱ्यांनी तो खरेदी केला आणि त्याला चांगला भाव मिळाला. भारतीय कांद्यासारख्या दिसणारा हा कांदा थोडा काळपट आणि लासलसर आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here