तिरूअनंतपूरम – केरळमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 74.06 टक्के मतदान नोंदले गेल्याचे स्पष्ट झाले. ते प्रमाण केरळमधील मागील निवडणुकांपेक्षा कमी ठरले आहे. केरळमध्ये विधानसभेच्या एकूण 140 जागा आहेत. त्या सर्व जागांसाठी 6 एप्रिलला एकाच टप्प्यात मतदान झाले. त्याला मतदारांनी भरघोस प्रतिसाद दिला. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीतील (2016) मतदानाची टक्केवारी यावेळपेक्षा अधिक ठरली.
मागील वेळी 77.53 टक्के मतदान झाले होते. त्यापेक्षाही अधिक मतदान (77.84) केरळमध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नोंदले गेले. तर, 2020 मधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत 76 टक्क्यांहून अधिक मतदारांनी त्यांचा हक्क बजावला होता. यावेळी डाव्या पक्षांची सत्तारूढ आघाडी आणि कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी यांच्यातच मुख्य लढत अपेक्षित आहे.
केरळमध्ये अजूनपर्यंत भाजपला फारसा राजकीय प्रभाव निर्माण करता आलेला नाही. तरीही त्या पक्षाच्या कामगिरीकडे लक्ष असेल. मागील विधानसभा निवडणुकीत 91 जागा पटकावत डाव्या आघाडीने केरळची सत्ता हस्तगत केली. त्यावेळी कॉंग्रेस आणि मित्रपक्षांना 47 जागांवर समाधान मानावे लागले. तर, भाजपला अवघी 1 जागा मिळाली.