ऍडलेड – अमेरिकेत बीडच्या एका दांपत्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बातमी ताजी असताना ऑस्ट्रेलियात एका भारतीय तरुणीची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. एकतर्फी प्रेमातून भारतीय तरुणीची ऑस्ट्रेलियामध्ये हत्या झाल्याची माहिती मिळाली आहे.
तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपीनं तिचा मृतदेह शहरापासून 400 किमी दूर नेवून पुरला आहे. विशेष म्हणजे संशयित आरोपीही भारतीय आहे. या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी आरोपीसह त्याच्या काका आणि मावशीला अटक केली आहे. चौकशी दरम्यान आरोपी तारिकने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. यानंतर पोलिसांनी 400 किमी दूर पुरलेला मृतदेह ताब्यात घेतला असून हत्येच्या नेमक्या कारणांचा शोध घेतला आहे.
मृत युवतीचं नाव जस्मीन असून ती मुळची पंजाबमधील संगरूर जिल्ह्याच्या नायारणगढ येथील रहिवासी आहे. तर आरोपी युवकाचं नाव तारिकज्योत सिंह असून तो लुधियाना जवळील एका गावातील रहिवासी आहे. मृत युवती अडीच वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात नर्सिंगच्या कोर्ससाठी गेली होती. यावेळी ती अॅडिलेडमध्ये पार्ट टाइम नोकरीही करत होती. ती ज्याठिकाणी नोकरी करत होती, ते दाम्पत्य संबंधित आरोपीचे काका आणि मावशी होते. आरोपीही त्याच ठिकाणी नोकरी करत होता. तेव्हापासून आरोपी जस्मीनला त्रास देत होता.