वॉशिंग्टन – अमेरिकेत वारंवार घडणाऱ्या गोळीबाराच्या घटना म्हणजे साथीचा रोग आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील लज्जास्पद बाब असल्याची भावना अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्त केली आहे. वारंवार होत असलेल्या गोळीबाराच्या घटनांना आटोक्यात कसे आणायचे याबाबत व्हाइट हाउसमध्ये झालेल्या एका समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. आता प्रार्थना करणे पुरे झाले आणि आता काही ठोस कृती करण्याची वेळ आली आहे, असे बायडेन म्हणाले.
टेक्सासमध्ये झालेल्या गोळीबारात एका कर्मचाऱ्याने केलेल्या गोळीबारात एक जण ठार आणि चार जण जखमी झाल्यानंतर काही वेळातच बायडेन यांनी अशा घटना रोखण्यासाठी 6 प्रतिबंधक उपाय योजना जाहीर केल्या. बंदूक खरेदी करणाऱ्यांसाठी कठोर अटींचे धोरण मान्य करायला क़ॉंग्रेस सदस्यांनी सहमती दाखवली नाही. त्यामुळे हे कठोर उपाय आवश्यक आहेत, असे बायडेन म्हणाले. बंदूकीशी संबंधित धोरण निश्चित करण्याच्या समितीवर डेव्हिड चिपमन या अधिकाऱ्याची नेमणूक बायडेन यांनी घोषित केली. घातक शस्त्रांवरील नियंत्रण निश्चित करणाऱ्या “एटीएफ’ या एजन्सीला 2015 पासून कोणीही संचालक नव्हते.
बायडेन यांच्या 6 उपाय योजनांमध्ये देशी बनावटीच्या बंदुकांवर निर्बंध घातले गेले आहेत. अशा बंदुकांना सिरीयल नंबर नसतात आणि वापरानंतर त्याचा माग काढणे अवघड असते.
दुसऱ्या प्रस्तावित नियमानुसार पिस्तलाच्या सहज उपलब्ध होण्यावर कडक नियंत्रण आणले जाईल. याशिवाय अमेरिकेत शस्त्रास्त्रांच्या तस्करीवर कडक निर्बंध आणले जाईल. 2000 साली या संदर्भातील सर्वसमावेशक अहवाल केला गेला होता. त्याची अंमलबजावणी केली जाईल. सामुहिक हत्याकांडासाठी वापरल्या गेलेल्या रायफलींच्या वापरावर कडक निर्बंध घालण्याचा प्रस्तावही बायडेन यांनी संसदेला दिला आहे. 1994 मध्ये सिनेटवर असताना बायडेन यांनी प्राणघातक हल्ल्यात वापरल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्रांवरील बंदीचे यशस्वीपणे समर्थन केले होते.