जनावरांचा बाजार बंदच : शेतकरी, व्यापारी धास्तावलेले
बेल्हे : जनावरांत लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने गोपालक शेतकरी व बैल व्यापार करणारे चिंतेत असून या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून महाराष्ट्रातील प्रशासन सतर्क झाले असून त्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यातील जनावरांचा बाजार अनेक दिवसांपासून बंद असल्याने जनावरांच्या बाजारातील लाखो रुपयांची उलाढाल थंडावली आहे. तसेच या बाजारावर अवलंबून असणाऱ्याची ओढाताण होत असल्याचे दिसत आहे.
प्रशासनाने जनावरांचे बाजार बंदचे आदेश दिले असून त्याचबरोबर जनावरांच्या वाहतुकीस जत्रा-यात्रेतील बाजार, जनावरांची खरेदी-विक्री बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे बाजार समित्यांमधील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. शेतकऱ्यांच्या जनावरांना लम्पी रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे शेतकरी व व्यापारी चांगलेच धास्तावले आहेत. कीटक, गोचिड, गोमाशा व डासांपासून गायी व म्हशीला प्रामुख्याने लम्पी रोगाची लागण होत आहे.
त्याचा प्रसार, माशा, गोचीड, डास व गोमाश्यांमार्फत होतो. त्या आजारांमुळे जनावरांच्या अंगावर फोड येणे, ताप येणे, नाकातून स्राव येणे, पायांवर सूज येणे, दुधाचे प्रमाण कमी होणे, चारा खाणे, पाणी पिणे कमी होणे असे प्रकार होत आहेत. लस खरेदीसाठी बेल्हे, बांगरवाडी, गुंजाळवाडी तसेच यशवंतराव पतसंस्था, साईलीला मेडिकल, पूजा पशुखाद्य, तांबेवाडी, यादववाडी, रानमळा, आदीमाया, पिंपळझाप आदी डेअरींसह जानकू डावखर, बाबाजी बांगर, अक्षय दिघे, सदानंद पिंगट, स्वप्निल भंडारी, तेजस घोडे, कोंबरवाडी, पारवेवस्ती, ढगीमळा, खोमणेमळा, डॉ. पिंगट, डॉ. अभिजित गुंजाळ यांनी सहकार्य केले असून आजमितीला बेल्हे परिसरात एकही लम्पी रुग्ण जनावर नसल्याचे बेल्हे पशुवैद्यकीय अधिकारी दीपक बेल्हेकर यांनी सांगितले.
लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांची लाखो रुपयांची उलाढाल बंद झाली आहे. लसीकरण करून शासनाने या रोगाला आटोक्यात आणून लवकर जनावरांचे बाजार सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
– संजय काळे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर
5100 जनावरांचे लसीकरण
लम्पी आजार जनावरांपासून मानवास संक्रमित होत नाही, तसेच बेल्हे परिसरात एकूण 5300 लहानमोठी जनावरे आहेत, त्यापैकी 5100 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.