उंडाळ – सध्या, सर्वत्र खासगी सावकारीचे लोन पसरत असून या सावकारीच्या विळख्यात तरुण, युवावर्ग गुरफटला जात असल्याचे चित्र दिसून येते. कराड दक्षिणेतही अशाप्रकारे एक खासगी सावकार कार्यरत असून तो तरुण, युवावर्गाला कर्ज देतो. मात्र, ते त्यांच्याकडून वसूल झाले नाही; तर त्या तरुण, युवकांच्या घरातील आई, वडील किंवा भाऊ यांच्यामागे वसुलीसाठी तगडा लावत आहे. केवळ बदनामी नको म्हणून तेही सावकाराच्या जाचाला बळी पडत असल्याने “खासगी सावकाराचा जोर; पोरांच्या आई-बापाच्या जीवाला लावतोय घोर’ अशीच काहीशी परिस्थिती निदर्शनास येत आहे.
बॅंकांकडून सहज कर्ज पुरवठा उपलब्ध होत नसल्याने आणि आर्थिक गरजा भागवण्यासाठी ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात तरुण, युवावर्ग किरकोळ गरजांसाठी खासगी सावकारांकडून भरमसाठ व्याजाने कर्ज उचलत आहेत. त्याचा फायदा अनेक सावकारांनी घेतला असून अशी अनेक उदाहरणे समाजात आहेत. परंतु, अशांवर कारवाई मात्र शून्य आहे. किंवा त्यांच्याविरोधात तक्रारदार समोर येत नसल्यामुळे सावकारांनी अमाफ माया गोळा केली आहे.
अशाच एका कराड दक्षिणमधील खासगी सावकाराच्या सावकारीचा चांगलाच बोलबाला सुरु आहे. हा सावकार आपल्या हस्तकांच्या माध्यमातून तरुण, युवकांना लक्ष करून त्यांना चढ्या व्याजदराने सहज कर्ज देतो. त्यानंतर कर्ज वसुलीसाठी बदनामी आणि दबावाचा फंडा वापरून अनेक तरुण, युवकांच्या आई-वडिलांना आणि कुटुंबियांना लाखो रुपयांचा गंडा घालत आहे. युवकांचे आई-वडील किंवा भाऊ आपला मुलगा/भावाने सावकाराकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी सावकाराकडून दबावतंत्राचा आणि बदनामीचा फंडा वापरला जात आहे. त्यामुळे केवळ आपली समाजामध्ये बदनामी नको म्हणून सावकाराच्या तोंडून येईल तो आकडा देऊन लोक प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करत असून आपसूकच या सावकराच्या वागणूकीला बळी पडल्याची अनेक उदाहरणे आहेत.
कर्ज दिलेल्या तरुण, युवकांकडून मिळेल तेवढी रक्कम व्याजाने गोळा करायची. आणि त्यांची मर्यादा संपली; की या सावकार महाशयांचा मोर्चा हा त्या तरुण, युवकांच्या घराकडे वळतो. त्यांनतर वसुलीच्या नावाखाली खरी सुरुवात होते बदनामी आणि दबाव तंत्राची. “तुमच्या मुलाने आमच्याकडून घेतलेल्या कर्जाचे केवळ व्याज दिले असून मुद्दल बाकी आहे. असे सांगून मुद्दलाची रक्कम आई-वडील किंवा घरातल्या सदस्याकडून वसूल करायची. हा फंडा या सावकाराने गेली अनेक वर्षांपासून चालू केला आहे. त्यामुळे “खासगी सावकाराचा जोर; आई-बापांच्या जीवाला लावतोय घोर’ अशी परिस्थिती सध्या उंडाळेसह दक्षिणेतील ग्रामीण भागामध्ये दिसून येत आहे.
ग्रामीण भागात बगलबच्चांची टोळी
आपला खासगी सावकारीचा धंदा तेजीत चालावा; यासाठी या सावकार महाशयांनी ग्रामीण भागातील अनेक युवकांना आपले बगलबच्चे केले आहेत. त्यांना खाऊ-पिऊ घालून बगलबच्चांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरे करणे, त्यांचा वसुलीसाठी वापर करणे आणि त्यांना पर्यटन सवारी घडवणे हा फंडा वापरून या खासगी सावरणे अनेक युवकांना आपल्या जाळ्यात ओढले आहे.
लायसन एकाचे; धंदा दुसऱ्याचा
जिल्ह्यासह कराड दक्षिणमध्ये विनापरवाना खासगी सावकारांचे पेव फुटले आहे. लायसन एकाचे; पण त्याचे बगलबच्चे सर्वजण मिळून खाजगी सावकारीचा धंदा तेजीत करत आहेत. त्यातून दर महिन्याला 20 ते 25 टक्के व्याजाची आकारणी केली जाते. वसुलीसाठी दमदाटी नेहमीचच आहे. त्यासाठी बगलबच्चे गुंडांची फौजच सावकारांकडे तैनात आहे. त्यामुळे मारहाण व समाजात बदनामी व अब्रु जाण्याच्या भीतीपोटी जो-तो म्हणेल तो परतवा भरता