हडपसर (विवेकानंद काटमोरे) – पुणे-सोलापूर महामार्गांवर उलट्या दिशेने वाहने चालवणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा प्रकारे वाहन चालवणे अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहे. हडपसर, मांजरी हद्दीतून जाणाऱ्या या महामार्गांवर ही स्थिती आहे. अशाप्रकारे उलटा प्रवास करुन स्वता:बरोबरच दुसऱ्याचाही जीव धोक्यात घालणाऱ्यांवर जबर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
एखाद्या जवळच्या ठिकाणी जायचे असेल तर लांबवर वळसा घालून येण्यापेक्षा रस्त्याच्या कडेने, पण चुकीच्या बाजूने वाहन चालविण्याची नवी पद्धत हडपसर व मांजरी परिसरात रुजली आहे. छोटे दुचाकी स्वारच नव्हे तर मनपाचे कचरा वाहतूक करणारी वाहने, पाण्याचे टॅंकर, मोटारी व ट्रकसारखी अवजड वाहनेही उलट्या दिशेने प्रवास करतांना दिसत आहेत.
परिणामी वाहतूक ठप्प होण्याचे वा समोरून येणाऱ्या वाहनाला चुकविण्याच्या नादात शेजारच्या वाहनाला धडक बसण्याचे प्रकार होऊ लागले आहेत. हडपसरच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या महामार्गांवरील हा त्रास वाहन चालकांच्या उरात धडकी भरवणारा ठरू लागला आहे.
रस्ता चौपदरीकरण केल्यानंतर महामार्गांवर रस्त्याच्या मधोमध डिव्हायडर टाकले गेले आहेत. पण असलेल्या चौकातून किंवा पंक्चरच्या ठिकाणावरून वाहने नियमित दिशेने जाऊन व पुन्हा वळून आपल्या दिशेने मार्गस्थ होण्याचा द्राविडी प्राणायाम करण्यापेक्षा चुकीच्या पद्धतीने उलट्या दिशेने जाण्याचा मार्ग स्वतःपुरता सोयीचा मानतात.
यामुळे या मार्गावरील नियमित वाहतूक विस्कळित होते. या नियमित वाहतुकीच्या वेगावर नियंत्रण येत असले तरी समोरच्या वाहनाला जागा देण्याच्या नादात आजूबाजूच्या वाहनांशी टक्कर होण्याची वेळ येते. वळसा घेण्यापेक्षा समोरून वाहन येत असताना उलट्या दिशेने जाण्याची मर्दुमकी दिवसेंदिवस वाढू लागली आहे.
वाहनचालक उलट्या दिशेने जाणारी ठिकाणे –
मगरपट्टा चौक, लोहिया उद्यान समोर, हडपसर गांधी चौक, हडपसर आकाशवाणी सिरम कंपनी फाटा, टेकवडे पेट्रोल पंप, पंधरा नंबर चौक, कुमार मिडोज सोसायटीच्या समोर,मांजरी स्टड फार्म, शेवाळेवाडी फाटा, मांजरी कृषी व ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र , आणि भापकर मळा फाटा याठिकाणी सर्रासपणे वाहनचालक रस्त्याची व वाहतूक नियमांची शिस्त मोडून उलट्या दिशेने जातात.याठिकाणी वाहतूक पोलिसांनी नियमित कारवाई करण्याची गरज आहे.
“स्पेशल पथकाकडून या ठिकाणी सातत्याने कारवाई केली जात आहे. याशिवाय असलेल्या चौकातील वाहतुकीचे नियोजन करून उलट्या दिशेने जाणाऱ्या अशा ठिकाणी कारवाई केली जाईल .वाहनचालकांनीही वाहतुक नियमांचे उल्लंघन करून जीव धोक्यात घालू नये.” – सुनिल जाधव (पोलीस निरीक्षक, हडपसर वाहतूक शाखा)