पुणे – कोंढव्यात भर रस्त्यात किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर चाकूने भोसकून एका 21 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला. कोंढवा खुर्द येथील गरीब नवाज हॉस्पिटल समोरील सार्वजनिक रस्त्यावर मंगळवारी (दि.25) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
अहमद रजा खान (वय 21, रा. युनिटी पार्क कोंढवा खुर्द) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सलीम इब्राहिम खान (वय 49, नवाजीश चौक, कोंढवा) याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत आरोपी देखील जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहे.
मयत तरुणाचा भाऊ सलमान फारूक खान (वय 23) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, अहमद रजा खान हा फिर्यादी यांचा लहान भाऊ आहे. मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तो गरीब नवाज हॉस्पिटल समोरून पायी जात होता. त्यावेळी त्याच्या ओळखीचा असलेला आरोपी सलीम खान याने अहमद रजा याच्याकडे रागात बघून वाईट वाईट शिवीगाळ केली.
दरम्यान शिवीगाळ का केली असे विचारणा करत अहमद रजा खान यांनी चाकू काढून आरोपीला घाबरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने त्याच्याकडील चाकू हिसकावून घेत तोच चाकू त्याच्या पोटात खूपसला. यामध्ये गंभीर जखमी होऊन रक्तस्त्राव झाल्याने अहमद रजा खान याचा मृत्यू झाला. या झटापटीत आरोपी सलीम हा देखील जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोंढवा पोलीस या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करत आहेत.