पिंपरी -चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने कोणत्याही परिस्थितीत लढवावी. ही जागा लढताना ती फक्त आणि फक्त घड्याळ या चिन्हावराच लढवावी. उमेदवार हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात कार्यरत असलेल्याच असावा, असे तीन ठराव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत शुक्रवार (दि.20) रोजी पारित करण्यात आले.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची पक्ष कार्यालयात एक बैठक झाली. जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ आणि एक औद्योगिक केंद्र असलेल्या चिंचवड मतदासंघांत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा आमदार करण्याची संधी सोडू नये असा ठराव पक्ष संघटनेने एकमताने पारित केला.
या बैठकीस राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर संजोग वाघेरे, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, युवकचे शहराध्यक्ष इम्रान शेख, विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी नगरसेवक शाम लांडे, मयुर कलाटे, विनोद नढे, पंकज भालेकर, राजेंद्र जगताप, अरूण बोऱ्हाडे,
गोरक्ष लोखंडे, राजू लोखंडे, विनायक रनसुभे, फझल शेख, नारायण बहिरवडे, माजी नगरसेविका माया बारणे, संगिता ताम्हाणे, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगीता कोकणे उपस्थित होते. शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, ही निवडणूक महापालिकेची रंगीत तालीम म्हणून बघायला पाहिजे. तसेच आपले पक्ष संघटन मजबूत असून बूथ स्तरीय तयारी झाली आहे. शहरात आरएसएसचे प्राबल्य वाढत असल्याने या गोष्टींना अटकाव घालण्याचे काम आपल्याला करायचे आहे.
ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर म्हणाले, एक महिना आपल्याला घरी जायचे नाही. विजयश्री खेचून आणायची आहे. आता कोणाची भीतीही नाही आणि सहानुभूतीही नाही. महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे म्हणाले, महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी ही पोटनिवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. चिंचवडमध्ये पक्षाचे अस्तित्व टिकविण्याच्या दृष्टीने ही निवडणूक लढणे गरजेचे आहे.
माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी गेल्या 10 वर्षांत राष्ट्रवादीचा आणि अजितदादांनी केलेल्या कामाचा फायदा घेऊन पक्षाचे नुकसान करताना कोणी विचार केला नाही. आता पक्षाने देखील कुणाचा विचार करायची गरज नाही, असे स्पष्ट मत मांडले. ज्येष्ठ नेत्यांनी देखील ही निवडणूक लढविण्यात यावी अशी भावना बोलून दाखवली.