अद्यापही भाजप कार्यकर्ते सत्तेविनाच
नगर – राज्यात सत्तांतर होऊन आठ महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्यापही विविध शासकीय समित्यांवरील अशासकीय सदस्य नियुक्त्यांना मुहूर्त सापडला नाही.या नियुक्त्या कधी होणार याबाबत भाजपसह शिंदे गटाच्या नेत्यांना प्रतीक्षा लागली असून जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे याबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी युती सरकारच्या कार्यकाळात या नियुक्त्या शेवटच्या दीड वर्षात झाल्या होत्या. आताही या नियुक्त्या लांबल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुर आहे.
महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर शिंदे – फडणवीस सरकार आले. त्यानंतर आघाडी सरकारच्या काळातील सर्वच शासकीय समित्यावरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्यात होत्या. आता या समित्या अशासकीय सदस्यविना रिक्त आहेत. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या समित्या असून जिल्हा व तालुकस्तरावरील या समित्यांवर अशासकीय सदस्य नियुक्त केले जातात. परंतु गेल्या आठ महिन्यांपासून या नियुक्त्यांबाबत कोणीच काही बोलत नसल्याने दिसून येत आहे. भाजप पक्षपातळीवर याबाबत अद्यापही चर्चा झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. पालकमंत्री विखे यांच्या कार्यालयाकडून विविध समित्यांची माहिती घेण्यात आली आहे. परंतु नियुक्तीबाबत निर्णय झालेला नाही.
भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी सध्या या नियुक्त्यांची प्रतीक्षा आहे. जिल्हास्तरावर 14, तालुकास्तरावर 10 तर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील सहा समित्या अशा 30 समित्यांवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. मात्र अद्यापही त्याबाबत कोणत्याही हालचाली दिसत नाही. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. राज्यात अडीच वर्षानंतर भाजपची सत्ता आली. परंतु सत्ते अद्यापही कार्यकर्त्यांचा सहभाग दिसत नसल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत पक्षीय नेते देखील काहीच बोलत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
पक्षपातळीवर शासकीय समित्यांच्या नियुक्तीबाबत निश्चित असे धोरण ठरले नाही. मात्र या पदावर पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांचा अधिकार असल्याने पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार असून मी स्वतः विविध समित्यांवरील सदस्यांची यादी तयार करून पालकमंत्र्यांना देणार आहे. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात या सर्व नियुक्त्या होतील.
– अरूण मुंढे, जिल्हाध्यक्ष भाजप