नवी दिल्ली – जागतिक क्रीडा क्षेत्रात तब्बल 92 देशांतील क्रीडा प्रकारात सट्टेबाजी, अनियमितता तसेच फिक्सिंग झाल्याचा संशय एका संस्थेने केलेल्या विश्लेषणात व्यक्त करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यात 2022 सालात झालेल्या तब्बल 13 क्रिकेट सामन्यांवरही संशय व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत स्पोर्ट इंटेग्रीटी या संस्थेसह बीसीसीआय व आयसीसी देखील संयुक्तपणे मोहीम राबवणार असून याबाबतचे तथ्य लवकरच समोर येइल, असेही सांगण्यात येत आहे.
या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या बेटिंग, करप्शन अँड मॅच-फिक्सिंग या 28 पानांच्या अहवालात याचे दाखलेही दिले आहेत. गेल्या वर्षी 92 देशांतील 12 क्रीडा प्रकारांमध्ये थोडेथोडके नव्हे तर तब्बल 1212 सामन्यांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यात सर्वाधिक सामने फुटबॉलमध्ये असून त्यांची संख्या 775 इतकी मोठी आहे. हे सामने भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडले आहेत.
बास्केटबॉल व लॉन टेनिसच्याही काही सामन्यांबाबत अनियमितता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच क्रिकेटमध्ये 13 सामन्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे नमूद करण्यात आले असून हे सामने कोणते ते मात्र जाहीर करण्यात आलेले नाही. ही संख्याही जास्त असू शकते असेही सांगण्यात येत आहे. हे सामने टी-20 आहेत, असेही आता समोर येत आहे मात्र, ते आंतरराष्ट्रीय सामने आहेत की लीगमधील सामने ते अद्याप सांगण्यात आलेले नाही.
#AFGvPAK T20I Series | रशीद खानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानने रचला इतिहास
भारतातील सामन्यांबाबत उल्लेख नाही
क्रिकेटच्या ज्या लढतींमध्ये गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे त्यात भारतात झालेल्या सामन्यांचा उल्लेख या अहवालात करण्यात आलेला नाही. मात्र, तरीही बीसीसीआय व आयसीसीने ही गोष्ट अत्यंत गांभीर्याने घेतली असून गैरप्रकार व अनियमितता शोधण्यासाठी संयुक्तपणे चौकशी केली जाणार आहे तसेच या सामन्यांचे रोकॉर्डिंग पाहिले जाणार असून त्यानंतरच याबाबत जाहीरपणे मत व्यक्त केले जाणार आहे. तसेच यात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.