पुणे- महापालिकेकडून दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीत वर्ग 1 ते वर्ग 3 च्या सुमारे 320 जागा भरल्या जाणार आहेत. या जागांसाठी महापालिकेने ऑनलाइन अर्ज प्रक्रियाही सुरू केली होती. मात्र, आतापर्यंत अवघे 5 हजार 329 अर्ज आल्याने पालिकेने या भरती प्रक्रियेस मुदतवाढ दिली आहे. आता उमेदवारांना 15 एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.
महापालिकेने जुलै-2022 मध्ये भरती प्रक्रिया राबविली. त्यात 448 मधील 445 जागा भरण्यात आल्य. या जागांसाठी 85 हजार अर्ज आले होते. त्यामुळे पुण्यासह अनेक मोठ्या शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर सहा महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करून पालिकेने दुसऱ्या टप्प्यासाठी 320 पदांची जाहिरात प्रकाशित केली. त्यात, सुमारे 200 पदे अग्निशमन दलाची असून उर्वरित पदे वर्ग-1 व 2 ची आहेत. या पदांसाठी राज्यभरातून प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती.
यात अर्ज करण्याची मुदत 28 मार्चपर्यंत होती. मात्र, सोमवारअखेर केवळ 5 हजार 329 अर्ज प्राप्त झाले असून, त्यातील सुमारे 2 हजार 300 अर्ज अग्निशमनदलासाठी आलेले आहेत. तर उर्वरित पदांसाठी 3 हजार अर्ज आले आहेत. त्यामुळे प्रशासनाने अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे.
कर्मचारी संपाचाही फटका
मागील आठवड्यात कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी पुकारलेल्या संपाचा फटकाही या अर्जांना बसला आहे. अनेक उमेदवारांनी अर्ज केले, मात्र आवश्यक शासकीय कागदपत्रे, दाखले मिळाले नसल्याने त्यांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाही. परिणामी, अनेक उमेदवारांनीही महापालिकेकडे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.